jagdish Dhodi, Prakash Nikam, Amit Ghoda  Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली; बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल

Political News : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदारसंघात उमेदवारी न दिल्यामुळे येथे महायुतीत बंडाळी झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

भगवान खैरनार

Palghar News : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करताच दोन्ही ठिकाणी बंडाळी उफाळून आली आहे. त्याला अपवाद पालघर जिल्हा देखील ठरलेला नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदारसंघात उमेदवारी न दिल्यामुळे येथे महायुतीत बंडाळी झाली आहे.

एकीकडे महायुतीचे नेते बंडाळी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी महायुतीच्या वरिष्ठांचे प्रयत्न सुरू असताना, तीन विधानसभा क्षेत्राचे बंडखोर उमेदवार मात्र नाॅट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात डोकेदुखी तर अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.  (Mahayuti News)

पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदार संघात निष्ठावंतांना डावलल्याने तसेच वरिष्ठांनी शब्द फिरवल्याने महायुतीमध्ये बंडाळी झाली आहे. येथे महायुतीतील नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावत, बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला बंडाचे ग्रहण लागले आहे. बंडाळी मोडीत काढण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू असताना, तीन विधानसभा क्षेत्राचे बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी तर अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 

राज्यात बंडखोरी केलेल्या मंडळींची मनधरणी करण्यासाठी युती आणि आघाडीच्या नेत्यांनी, गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. 

बोईसरमध्ये महायुतीने माजी आमदार विलास तरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी बंड करत, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पालघरमध्ये माजी आमदार अमीत घोडा यांना डावलून येथे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीतांना (Rajendra Gavit) उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमित घोडा यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विक्रमगडची जागा भाजपने (BJP) आपल्याकडे राखत जेष्ठ कार्यकर्ते हरिश्च॔द्र भोये यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाने या जागेसाठी मोठा आग्रह धरला होता. विक्रमगडसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावान प्रकाश निकम प्रबळ दावेदार होते. त्यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने, अखेर त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत विक्रमगडमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

महायुतीत पालघरच्या ग्रामीण भागातील मतदारसंघात बंडखोरी झाल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. येथील बंड रोखण्यासाठी युतीचे वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, हे तीनही बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल असल्याने अडचणीत वाढ झाली आहे.  

दरम्यान, जगदीश धोडी, अमित घोडा यांचे फोन बंद लागत असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. तसेच प्रकाश निकम आणि त्यांच्या खासगी सचिवाचा ही फोन नंबर बंद दाखवत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचाही त्यांच्याशी संपर्क झालेला नसल्याचे, कार्यकर्ते सांगत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील ते आढळून आलेले नाहीत. त्यामुळे हे तीन उमेदवार, बंडखोरीबाबत ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनगांच्या नाराजी नाट्यावर पडदा

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने ते नैराश्यात गेले आणि त्यानंतर चार दिवस गायब झाले होते. आमदार वनगा अखेर तीन दिवसांनी घरी परतले. घरी येताच वनगा यांचा सूर मुख्यमंत्र्यांविरोधातील बदलला आणि त्यांनी पक्षासोबत कायम राहणार असल्याचे जाहीर करून नाराजी नाट्यावर पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT