Marathi School: राज्यातील २००० मराठी शाळा अडचणीत आल्या असून ६२० शाळा बंद होणार आहे, अशी बाहेर चर्चा आहे. तसेच खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गेल्या दोन वर्षात २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत, अशी माहिती दिली होती. मराठी शाळांबाबतची ही चर्चा गंभीर स्वरुपाची असल्यानं याबाबत खुद्द मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच मराठी शाळांकडं पुन्हा एकदा पालक वळत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शाळा बंद होणार या चर्चांना उत्तर देताना म्हटलं की, हा खरोखरच प्रश्न आहे आणि तो सर्वांनाच विचारला पाहिजे. कारण आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवतो आणि इथं सभागृहात मराठी शाळा बंद पडत असल्यावर चर्चा करतो. यामागे केवळ आपली भावना असून चालणार नाही. त्यामुळं मला पंतप्रधानांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं सर्व शिक्षण हे मातृभाषेतून केलं आहे. नाहीतर मग कशाला कोण मातृभाषा शिकेल, मराठी भाषा शिकेल?
बरं मराठी शाळा बंद पडत असल्याचे हे आकडे इतक्या आत्मविश्वासानं येतात कुठून हेच मला समजत नाही. २००० मराठी शाळा बंद करणार, ६५,००० मराठी शाळा बंद पडल्या असं सांगितलं जातं. मी आकडेवारीच घेऊन आलो आहे. आपल्याकडं ज्या शाळा होत्या त्या कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाहीत थोड्या काही बंद पडल्या असतील. पण एकूणच आपण जर बघितलं तर आमच्याकडं ८४ टक्के शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत या शाळांमध्ये ६९ टक्के विद्यार्थी शिकत आहेत. जवळपास १६,००० हजार शाळा या स्वयं अर्थसहाय्यित आहेत. तसंच इंग्रजी शाळांमध्ये ६५ लाख विद्यार्थी शिकत आहेत.
मागे आपल्याच सरकारनं निर्णय घेतला होता की, मराठी शाळांमध्ये आपण इंग्रजी देखील शिकवू, त्यामुळं विद्यार्थी मराठी शाळेतून बाहेर पडणार नाहीत. गेल्यावेळी २०१७-१८ साली याच सभागृहात मी सांगितलं होतं की, जवळपास ५० हजार मुलं खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले होते. त्यामुळं आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये इच्छा आहे. पण ही जी काही २००० शाळा बंद करणार, ६५ हजार मराठी शाळा बंद पडल्या ही जी काही आकडेवारी आली आहे, ती कपोलकल्पित आकडेवारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.