Yashwant Jadhav gave a watch worth Rs 2 crore and Rs 50 lakh to Matoshree sarkarnama
मुंबई

IT Raid: यशवंत जाधवांनी दिले 'मातोश्री'ला दिले दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ

Yashwant Jadhav| IT raid| Matoshree| महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी (BMC) कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला (Incom tax department) काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. या डायरीत काही महत्त्वाचे व्यवहाराचे पुरावे सापडल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याची माहिती आहे. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो ट्विट करत यशवंत जाधव यांच्यावर निशाणा सााधला आहे. 'यशवंत जाधव यांनी गुढी पाडव्यास ‘मातोश्री’ला 2कोटी रुपये प्रदान केल्याची नोंद आयटी खात्यास जाधवांच्या डायरीत सापडली आहे. पण मातोश्री म्हणजे आपली आई असून ते 2कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधवांनी केल्याचे या बातमीत म्हटले आहे. धन्य तो श्रावणबाळ,'' असे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे

न्यूजस्टॉक कंपनीच्या व्यवहारांचीही चौकशी केली

या दोन संशयास्पद नोंदींव्यतिरिक्त, आयकर विभाग न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. ठेकेदार बिमल अग्रवाल हे कंपनीचे मालक आहेत. बॉम्ब निकामी घोटाळा आणि सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच अग्रवालची चौकशी केली आहे.

यशवंत जाधवांच्या पत्नीचे शपथपत्राने पोलखोल

यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यात कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

31 फ्लॅट खरेदी केले, हवालाद्वारे पैसे दिले

जाधव यांनी भायखळा येथील बिलकाडी चेंबर्स येथे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 31 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. जाधव यांनी इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले होते. भाडेकरूंना हवालाद्वारे काही देयके देण्यात आली. विभाग इतर चाळीस मालमत्तांचीही चौकशी करत आहे. या मालमत्ता जाधव यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.

1.75 कोटींना हॉटेल खरेदी केले, 20 कोटींना विकले

जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळा येथे इंपिरियल क्राउन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. न्यूजहॉक मल्टीमीडियाने ते हॉटेल भाड्याने दिले होते. यानंतर न्यूजहॉक कंपनीला बीएमसीकडून क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. हे हॉटेल 1.75 कोटींना विकत घेण्यात आले होते, परंतु नंतर सुमारे वर्षभरात 20 कोटींना विकले गेले. जाधव यांच्या सासूबाईंनी हे हॉटेल खरेदी करण्यात प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

जाधव यांनी मंजूर केलेल्या कंत्राटांची माहिती मागवली

जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना एप्रिल 2018 पासून मंजूर झालेल्या कंत्राटांची माहिती आयकर विभागाने बीएमसीकडून मागवली आहे. याशिवाय सर्व कंत्राटदारांचा तपशील आणि त्यांना बीएमसीने केलेल्या पेमेंटचीही माहिती मागवण्यात आली आहे. जाधव यांच्यासह अन्य काही कंपन्यांमध्ये बिमल अग्रवाल हे भागीदार असल्याचेही विभागाला आढळून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT