Jayant Patil News : राज्याच्या राजकारणात संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राजकीय चर्चांपासून काहीसा वेगळा अनुभव घेतला. जयंत पाटील यांनी मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने एकट्यानेच भूमिगत प्रवास केला.
ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास करताना त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, या भूमिगत मेट्रो मार्गाचा प्रस्ताव आपण मुंबईचे पालकमंत्री असताना मंजूर झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रवासाचा व्हिडीओ आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते मेट्रोने एकट्याने प्रवास करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भूमिगत मेट्रोचा पर्याय निवडण्यामागील तत्कालीन निर्णयाची माहिती दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण मुंबईचे (Mumbai) पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावेळी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता.
मात्र, दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा वास्तूंचे जतन होणे आवश्यक होते. तसेच मंत्रालय, विधानभवन आणि विविध शासकीय व खासगी कार्यालयांमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी आग्रही भूमिका आपण घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज याच मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुकर होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याची भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपत शहराचा शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जयंत पाटील यांचा अर्थमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. 1999 आणि 2004 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नेत्यांमध्येही त्यांचे नाव घेतले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.