Chhagan Bhujbal , Jayant Partil Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal : भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील पहिल्या विमानात होते...; भुजबळांनी सगळंच सांगितलं

Ajit Pawar NCP : 'अनेकदा ठरवले होते, मात्र ऐनवेळी जाण्याचा कार्यक्रम रद्द'

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणून आमच्यावर टीकेची झोड उठवली जाते. विचारधारेशी प्रतारणा केल्याचा आरोप केला जातो. मात्र, शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही, असा प्रश्न उपस्थित करून मंत्री छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर निशाणा साधला. तु्म्हीच अनेकदा भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न केले. जयंत पाटील तर पहिल्या विमानात बसून भाजप नेत्यांच्या भेटीला जाणार होते, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

रायगडमधील कर्जत येथे अजित पवार गटाचा निर्धार मेळावा सुरू आहे. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळांनी पूर्वी राष्ट्रवादीने किती वेळा भाजपसोबत जाण्याचे ठरवले, याबाबत सगळंच सांगून टाकले. '२००४ पासूनच पूर्वीच्या नेतृत्वाचे भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याबाबत मला जास्त माहिती नव्हती. मात्र, ज्यावेळी समजले, त्यावेळी तळ्यात-मळ्यात करायचे सोडून ठोस भूमिका घेतली. सगळ्यांनीच सह्या केल्या. यात ५४ आमदारांसह खासदारांचाही समावेश होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी विमान तयार होते. त्यातून जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार जाणार होते,' असे सांगून पहिल्या विमानात पाटीलही बसल्याचे सांगितले.

'विमान तयार असताना जयंत पाटलांना काय वाटले कुणास ठाऊक, ते साहेबांना विचारायला गेले. त्यांनी सांगितले की विमान तयार आहे. आम्ही जाऊ का. त्यावर साहेब म्हणाले, थांबा थांबा कुठेही जाऊ नका. बरं असे प्रकार एकदा झाला तर ठीक. तुम्ही एका पक्षाला हो म्हणून सांगितले आणि दोनदा, तीनदा. चार वेळा... पाचव्यांदा ऐनवेळी नकार देता. हे बरोबर असते का ?' असे म्हणत भुजबळांनी नाव न घेता पवारांवरही निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आम्ही ना पक्ष बदलला नाही आमची भूमिका, असेही भुजबळांनी ठणकावून सांगितले. हा पक्ष नवीन नाही, जुना आहे. १९९९ मध्ये स्थापन झाला हाच तो पक्ष आहे. ज्या पक्षाचा पहिला प्रातांध्यक्ष छगन भुजबळ होते, तो हाच पक्ष आहे. आता सगळेच इकडे आले तर आम्ही करायचे काय? आता आम्ही भूमिका वेगळी घेतली तर काय चुकले. आम्ही काय विचार सोडले आहेत का ? आमचा पक्ष वेगळा आहे, राष्टवादी काँग्रेस त्याचे नाव आहे,' असा दावाही भुजबळांनी केला.

विचारधारा सोडली, विचारांशी प्रतारणा केली, असा आरोप करणाऱ्यांनाही भुजबळांनी सुनावले. ते म्हणाले, 'भाजपसोबत नितीश कुमार, जयललिता, नवीन पटनाईक, मेहबूबा मुफ्तीही गेल्या होत्या. त्यांनी त्यांचे विचार बदलले का ? ते आहे तिथेच आहेत. आम्हीही कुठलाही मार्ग बदलेला नाही. विचारधारा बदलेली नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर गेलो.'

"यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो होताे का ? शिवसेना आणि भाजप यांची विचारधारा सारखीच आहे. तिकडे बसले तर चालते आणि इकडे का नाही ? मात्र, तुमच्याच मनात भाजपसोबत जाण्याचे पाच-सात वेळा आले होते. मात्र, ऐनवेळी तुमचा कार्यक्रम रद्द,' असे सांगून भुजबळांनी टीकाकारांचा सडकून समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT