Kisan Kathore Devendra Fadnavis Kalyan APMC Land sarkarnama
मुंबई

Kalyan APMC Land : बाजार समितीचा भूखंड वादात, आमदार कथोरे आक्रमक; थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Kisan Kathore Devendra Fadnavis : कल्याण बाजार समितीचा भूखंड व्यापारी संघटनेला देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. याविषयी आमदार किसन कथोरे यांनी थेट मुख्यमंत्र्याडे तक्रार केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kalyan News : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २८२ आणि २८४ मधील तब्बल ५० गुंठे जागा लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित संघटनेला यापूर्वीच ३२४ व्यापारी गाळे उपलब्ध करून दिले असताना पुन्हा भूखंड देण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तत्कालीन प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी हा निर्णय घेताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली होती का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया २१ मे २०२५ रोजी जाहीर झाली होती. २९ जून २०२५ मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक निवडून आले. मात्र, सभापती आणि उपसभापतींची निवड होण्यापूर्वीच ३० जूनला तत्कालीन प्रशासक डॉ. मांडे यांनी लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला ५० गुंठ्यांचा भूखंड देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पणन संचालकांकडे प्रस्तावही पाठविल्याचे कथोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

भूखंड वाटपाच्या निर्णयाला बाजार समितीतील व्यापाऱ्यांचाही विरोध आहे. व्यापारी गणेश पोखरकर यांनी या निर्णयावर आक्षेप घेत बाजार समितीच्या मालमत्तेचा वापर एखाद्या संघटनेच्या फायद्यासाठी होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील भूखंड वाटपाची प्रक्रिया, त्यासाठी वापरलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि बाजार समितीला मिळणारा मोबदला यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री जयकुमार रावल आणि पणन सचिवांकडे करण्यात आली आहे.

संबंधित ५० गुंठ्यांचा भूखंड दहा वर्षाच्या भाडेपट्ट्याने दिल्याची माहिती बाजार समितीतील व्यापारी संघटना देत आहे. यासाठी केवळ २० लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली असून, या जागेवर १३० दुकाने बांधून ती अन्य व्यापाऱ्यांना विकण्याची तयारी आहे. या व्यवहारातून बाजार समितीला वर्षाला केवळ अडीच लाख रुपये भाडे मिळणार असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत तत्कालीन प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

नव्या भूखंडाची गरज काय?

संबंधित संघटनेला २०१२ मध्ये 'ए' इमारतीत ३२४ गाळे दिले. असे असतानाही पुन्हा ५० गुंठ्यांचा भूखंड देण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल कथोरे यांनी उपस्थित केला आहे. भूखंड वाटप करताना लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र, लेखापरीक्षण अहवाल, कार्यकारी मंडळाची माहिती आणि संघटनेची घटना यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

बाजार समितीचे आर्थिक नुकसान

बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर पर्यायी बाजारपेठ उभी राहणार असताना त्याचा आर्थिक लाभ बाजार समितीऐवजी खासगी व्यापारी संघटनेला मिळण्याची शक्यता असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या व्यवहारामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिवेशनात लक्षवेधी मांडणार

आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक डॉ. किशोर मांडे यांनी अपारदर्शक कारभार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान आणि विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी व्हावी, यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT