Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष महापौर निवडीकडे लागले आहे. त्यामुळे राज्यभरात मोठ्या घडामोडी घडत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी चार नगरसेवक 'नॉट रिचेबल' आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या नगरसेवकांचा शोध ठाकरे सेनेच्या शिवसैनिकाकडून घेतला जात आहे.
त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने आता 'त्या' नगरसेवकांच्या घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांची बॅनरबाजी केली आहे. दोन दिवसात हजर न झाल्यास सदस्यत्व रद्द करण्याबाबत पावले उचलण्यात येतील, असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीतील पक्षीय बलाबल पहिले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) 53 नगरसेवक निवडून आले आहेत तर दुसरीकडे भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महायुती म्हणून दोन्ही पक्षाचची सत्ता येऊ शकते. मात्र, याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळावर सत्तास्थापन करायची असल्याने त्यांनी मनसेच्या तीन नगरसेवकाचा माध्यमातून ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार नगरसेवक गळाला लावले असल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, त्यापैकी कीर्ती ढोणे, मधुर म्हात्रे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे हे चार नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर आहेत. हे नगरसेवक शिंदे गट किंवा मनसेच्या संपर्कात असल्याचा संशय पक्षाला आहे. त्यामुळेच त्यांचा शोध घेतला जात असून त्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात आहेत.
येत्या काळात नॉटरिचेबल असलेल्या या चार नगरसेवकांनी पक्षादेश (व्हिप) पाळला नाही किंवा गट नोंदणीसाठी हजर झाले नाहीत, तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेने केवळ कायदेशीर नोटीसवर न थांबता, शिवसैनिकांनी या नगरसेवकांच्या घराबाहेर आणि प्रभागात मोठे बॅनर्स लावले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेचे 4 नवनिर्वाचित नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. या नगरसेवकांच्या बंडाची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने आता थेट घरासमोर बॅनर लावून सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात या चार नगरसेवकांच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.