KDMC News : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी या मैत्रीवर केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे.
“शोलेची दोस्ती आहे… आणि शोलेच्या दोस्तीमध्ये काय होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं समोरच्याला जास्त धोका आहे,” असे म्हणत चव्हाण यांनी कोणाचेही नाव न घेता शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या जवळिकीवर भाष्य केले होते.
चव्हाण यांच्या या विधानाचा रोख मनसेकडे असल्याची चर्चा सुरू असतानाच कल्याण-शिळफाटा रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावर शिंदेंची शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्ता रुंदीकरणासाठी भूमिपुत्रांना तब्बल १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रश्नासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि मनसे नेते राजू पाटील यांनी एकत्रितपणे पाठपुरावा केला.
त्यामुळे “शोलेची दोस्ती” अशी टीका होत असतानाच जय-वीरूने एकत्र येत मैत्रीची झलक दाखवून दिल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा विषय केवळ राजकीय समीकरणांचा नसून कल्याण-शिळफाटा मार्गासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या भूमिपुत्रांच्या हक्काच्या मोबदल्याचा आहे. त्यामुळे या प्रश्नावर शिवसेना आणि मनसेने एकत्र येत भूमिका घेतल्याने स्थानिक राजकारणात त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान, भूमिपुत्रांच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे एकत्र येत असताना नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचाही मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. भूमिपुत्रांच्या या मागणीबाबत भाजप आता नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एका बाजूला “शोलेची दोस्ती” म्हणत राजकीय टोलेबाजी सुरू असताना दुसऱ्या बाजूला भूमिपुत्रांच्या प्रश्नावर शिंदे आणि पाटील एकत्र आल्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात जय-वीरूची दोस्ती नेमकी किती पुढे जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.