Mahesh Gaikwad, Sulbha Gaikwad  Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : कल्याण पूर्वेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ताणाताणी; भाजप, शिवसेना शिंदे गटात वादाची शक्यता

Kalyan East election candidates: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकासमोर उभे टाकण्याची शक्यता आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivali News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाल्यानंतर आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकासमोर उभे टाकण्याची शक्यता आहे. येथे भाजपने विद्यमान आमदार किंवा त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढू असा इशारा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे कल्याण पूर्वेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ताणाताणी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे (BJP) आमदार गणपत गायकवाड यांचा मतदारसंघ आहे. गेले तीन टर्म गायकवाड येथील आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड हे येथुन आमदारकी लढण्यास इच्छुक आहेत. यातून कायम दोन्ही गायकवाड एकमेकांसमोर येऊन त्यांच्यातील वाद वाढत होते.

एका जमिनीच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यात शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केला. तेंव्हाही महेश गायकवाड आणि भाजपचे गणपत गायकवाड यांच्यात वितुष्ट आले आहे.

आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे तळोजा कारागृहात आहेत. यामुळे त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या मतदारसंघात सक्रिय झाल्या असून मतदारसंघातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहेत. सुलभा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे.

कल्याण पूर्वेतून आमदार गायकवाड यांना उमेदवारी मिळणार नाही असा अंदाज बांधून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून विशाल पावशे, नीलेश शिंदे, महेश गायकवाड इच्छुक आहेत. महेश गायकवाड हे पहिल्यापासून आमदारकी लढण्यासाठी इच्छुक आहेत. मध्यंतरी ते ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा होती. मात्र, पक्षातील वरिष्ठांनी त्यांना गप्प केल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता त्यांनी भाजपने आमदार गायकवाड यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिल्यास त्या विरोधात अपक्ष लढण्याचा इशारा दिल्याने त्यांच्या मनातील खदखद बाहेर आल्याचे बोलले जात आहे.

शहर प्रमुख महेश गायकवाड म्हणाले, महायुती म्हणून भाजपने कल्याण पूर्वेत जरूर उमेदवार द्यावा. आम्ही त्याचे महायुतीचा धर्म म्हणून नक्की काम करू. कल्याण पूर्वेचे अनेक वर्ष शोषण झाले. हा भाग भकास झाला. सामान्य जनतेला आता विकास हवा आहे. या विकासासाठी 15 वर्ष मागे राहिलेल्या कल्याण पूर्व भागाला सामान्य लोकांच्या मागणीप्रमाणे आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

भाजपने या भागात उमेदवार दिल्यास आपण काम करू. त्याच घरातील आणि त्याच व्यक्तीला उमेदवारी दिल्यास मात्र आपण वेगळा विचार करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहोत, असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे. महेश गायकवाड यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे काय भूमिका घेतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT