Srikant Shinde, Anurag Thakur
Srikant Shinde, Anurag Thakur Sarkarnama
मुंबई

Anurag Thakur News : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांच्या वक्तव्याने कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत

शर्मिला वाळुंज

Kalyan-Dombivli News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातुन भाजपा दावा ठोकणार का? याविषयीच्या चर्चा रंगत असताना शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केले आहे, की जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे शिवसेनेचे उमेदवार जागा लढवणार.

माझ्या मनात काही संभ्रम नाही तसेच भाजपाचे (BJP) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे चांगले मित्र आहेत असे सांगितले. शिंदे यांचे मित्र केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मात्र मित्राला सल्ला देताना सांगितले हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, ती वेळ 2024 मध्ये येईल. मंत्री ठाकूर यांच्या या सल्ल्यामुळे कल्याण लोकसभेची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजपा या जागेवर उमेदवार देऊ शकतो हे नाकारता येत नाही, असेही बोलले जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असून भाजपाने येथे मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला उभारी देण्यासाठी अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी रविवारी उल्हासनगरच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी त्यांनी दोनदा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे.

भाजपच्या या मोर्चेबांधणी मुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा ठोकणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा दाखविल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा देण्याची शक्यता आहे.

सध्या ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून आपल्या मतदार संघातील विकास कामांवर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे कल्याण मतदारसंघावरील दावा ते सहजासहजी सोडणार नाहीत असेच सध्या दिसून येत आहे. भाजप मधून या जागेवर डोंबिवलीचे विद्यमान आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी कल्याण ग्रामीण मध्ये लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या वेळी ते म्हणाले, लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले, त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे सुरू आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत. ते जेव्हा-जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण दिले. यावरच भाजप कडून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले की हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. ती वेळ 2024 मध्ये येईल, आत्ता ती वेळ नाही. जर आम्ही सगळी कामे आणि विकास एकत्र करत आहोत. तर हा निर्णय सुद्धा एकत्र बसून घेतला जाईल असे सांगितले. शिवसेनेचा ठोक दावा आणि भाजपाचे वेळेचे सूतोवाच यावरून कल्याण लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

कोण असू शकतात कल्याण लोकसभेसाठी उमेदवार...

शिवसेना (शिंदे गट ) - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

भाजप - कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण

महाविकास आघाडी - माजी आमदार सुभाष भोईर किंवा माजी खासदार आनंद परांजपे

मनसे - आमदार राजू पाटील

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT