Kalyan West Constituency: विधानसभा निवडणुकीसाठी सर्व हेवेदावे विसरुन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.ही निवडणूक युती आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेची असल्याने नेत्यांची नाराजी दूर करत उमेदवारांना फटका बसणार नाही ना याची काळजी घेतली जात आहे. अशातच कल्याण पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातही भाजप -शिवसेना शिंदे यांच्या पक्षात मनोमिलनासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपचं काम न केल्याचा राग असल्यानं या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना माजी मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) विधानसभा निवडणुकीत साथ देणार नाही असे बोलले जात होते.त्यातच भाजपाचे वरूण पाटील हे बंडखोरी करत उभे राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गट व मनसेचे उमेदवार देखील रिंगणात असल्याने भोईर यांना ही निवडणूक जिंकणे कठीण झाले आहे.
महायुतीतील शिवसेना (Shivsena) शिंदे पक्षाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं चांगलाच जोर लावला आहे. भोईर यांनी भाजपचे नाराज माजी मंत्री कपिल पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही शिवसेनेकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहेत. मात्र, पाटलांची नाराजी दूर झाली का ? शिंदे भाजपाचे मनोमिलन झाले की, नुसतीच भेट झाली या चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग. या मतदारसंघात येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपील पाटील यांचा राष्ट्रवादीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी पराभव केला आहे. पाटलांची विजयाची हट्रिक चुकल्याने हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाने भाजपाला मदत केली नसल्याचा आरोप पाटील समर्थकांनी केला होता.
तसेच राष्ट्रवादीचे बाळ्या मामा यांना शिंदे गटाने मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाटील आणि शिवसेनेत मागील काही महिन्यांपासून दुरावा निर्माण झाला होता. या दुराव्यातून पाटील यांचे भाजपमधील नातेवाईक कल्याण मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांनी बंडखोरी करत पश्चिमेतून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा होती. मंत्री पाटील विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात दिसत नव्हते.
भाजपाचे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण पश्चिमेत असल्याने त्यांची साथ महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यासाठी महत्वाची आहे. मंत्री पाटील यांची नाराजी, वरूण पाटील यांच्या उमेदवारीचा विश्वनाथ भोईर यांच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भजपाची मते विखुरली जाणार आहेत. याचा फायदा विरोधी पक्षातील ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दुरावा सोडून मंत्री पाटील यांनी भोईर यांच्या प्रचारात सहभागी व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी जोरदार प्रयत्नशील होते. अखेर शिंदे पिता-पुत्रांच्या खास समर्थकांनी कल्याणमध्ये रविवारी माजी मंत्री पाटील यांची भेट घेतली. या चर्चेतून पाटील यांनीही विश्वनाथ भोईर यांचे काम करण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेनेचे एका वरिष्ठाने सांगितले. पाटील व भोईर यांची भेट झाली असून त्याचे फोटो समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या भेटीमुळे कल्याण पश्चिमेला शिंदे गट व भाजपाचे मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आतील गोटात वेगळीच चर्चा सुरू आहे. खरेच मनोमिलन झाले का ? भाजपाचे मंत्री पाटील यांची नाराजी दूर झाली आहे का ? भेटीगाठी तर झाल्या पण खरेच भाजपाकडून सहकार्य मिळणार का ? या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.