Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Sarkarkana
मुंबई

Fadnavis Question Thackeray : सावरकरांवरून फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलं ; म्हणाले, "सत्तेसाठी तुम्ही..."

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसने भाजपने केलेले कायदे बदलण्याचे सुतोवाच केले होते. त्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. पूर्वीच्या भाजप सरकारने कर्नाटकमध्ये धर्मांतर विरोधी कायदा केला होता. तो कायदाच आता सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के.बी.हेडगेवार यांच्यासंबंधित धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक सरकार पुस्तकातून सावरकर आणि हेडगेवारांचे धडे काढू शकते, मात्र लोकांच्या मानातून त्यांना कसे काढणार, असा प्रश्नही यावेळी फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे सरकारकडून यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षीत नाही. केवळ अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. एखादा धडा तुम्ही वगळू शकता, पण लोकांच्या मनातून तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही. सावरकरांना काढू शकत नाही. कोणतेही स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकांच्या मनातून काढू शकत नाही"

फडणवीस यांनी महाविकास आघाडीलाही प्रश्न केला आहे. ते म्हणाले, "तुम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार असल्याचे वारंवार सांगता. तो कर्नाटक पॅटर्न म्हणजे हाच आहे का? " यानंतर फडणवीस यांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावकडे वळवला. सावरकरांचे नाव वगळण्यावर ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, "ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत तेच आता सावरकरांचे नाव पुसण्यासाठी पाऊल उचलत आहे. ते धर्मांतराला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता आपली प्रतिक्रिया द्यावी. नाहीतर त्यांनी केवळ सत्तेसाठी तुम्ही हा समझोता केला हेच यातून स्पष्ट होत आहे."

दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव घेऊन भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसला दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस बॅकफूटवर आले होते. आता कर्नाटक काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT