Mumbai News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बहुमत नसतानाही भाजपच्या मदतीने सत्तास्थापन केली आहे. महापौरपदी एकनाथ शिंदे यांच्य्या शिवसेनेच्या हर्षाली थविल-चौधरी तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांनी बाजी मारली. या निवडींनंतर सर्वांचे लक्ष आगामी काळात होत असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाकडे लागले आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात त्यासाठी सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या सभेत स्थायी व परिवहन समितीच्या सदस्यांची निवड होणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापती व सभागृह नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता नवी मुंबईत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवल्याने आता त्याचा बदला घेण्यासाठी मोठे प्लॅनिंग केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या मदतीने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीत बाजी मारली. त्यामुळे आता स्थायी समिती सभापती निवडीत भाजपला संधी देणार का? याची उत्सुकता लागली असतानाच नवी मुंबईत संधी मिळाली नसल्याने शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार शाब्दिक युध्द सुरू आहे. या धुसफुशीतून मंत्री नाईक यांनी नवी मुंबई पालिकेतील सत्ता सहभागापासून शिवसेनेला दूर ठेवले. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे त्याचा बदला घेण्याची तयारी करीत असल्याचे पुढे आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यात 53 विरुद्ध 50 अशी नगरसेवकात चुरस असली, तरी सत्तेचा समतोल राखण्यासाठी महापौरपद शिवसेनेला तर महत्त्वाची आर्थिक ताकद असलेले स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला देण्याचे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पाहावयास मिळत आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करून कल्याण डोंबिवली पालिकेचे महापौर पद एकहाती बळकावलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्थायी समितीचे सभापती पद आपल्या भक्कम संख्याबळाच्या जोरावर भाजपला मिळू नये, म्हणून जोरदार हालचाली दोन दिवसांपासून सुरू केल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेत वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी शिवसेना शिंदे गटाला पालिकेतील सत्तेत सहभागी होण्यापासून रोखले. त्याचा वचपा आता शिवसेना शिंदे गटाने कल्याण डोंबिवली पालिकेत भाजपला स्थायी समिती सभापतीपदापासून रोखण्याच्या माध्यमातून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आता भाजपला कशाप्रकारे रोखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्षपद हे वाटाघाटीनुसार भाजपकडे जाण्याचे संकेत आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) ज्येष्ठ नगरसेवक वरुण पाटील किंवा मल्लेश शेट्टी यांच्या नावांची दाट शक्यता आहे. वरुण पाटील हे या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणूनही चर्चेत राहिले आहेत, तर मल्लेश शेट्टी यांच्याकडे दांडगा प्रशासकीय अनुभव आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभागृह नेतेपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून निलेश शिंदे किंवा दीपेश म्हात्रे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. निलेश शिंदे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अपात्रतेसाठी अंतिम इशारा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला ४८ तासांच्या आत उत्तर दिले नाही तर अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोकण विभागीय आयुक्ताकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या बाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.