CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाची धडधड वाढली; 'या' महत्त्वाच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा ?

Ganesh Thombare

Mumbai Political News: लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय पक्षांच्या हलाचाली चांगल्याच वाढल्या आहेत. नेते मंडळींनी तर सभा, मेळावे, बैठकांचा सपाटा लावला आहे. यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मतदारसंघांसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (Marathi News)

दक्षिण मुंबईपाठोपाठ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरही भाजपचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची धडधड वाढली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपला साथ दिल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं.

यानंतर पुढे राष्ट्रवादीचा अजित पवार (Ajit Pawar) गटही महायुतीत सहभागी झाला. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून तीनही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच शिवसेना शिंदे गटाच्या काही लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं बोललं जात आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकरांच्या मतदारसंघावर भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकरांसह शिंदे गटाचेही टेन्शन वाढले आहे. गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघावर आता भाजपचा डोळा असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत, तर गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगाच ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

मात्र, कीर्तिकरांचे वाढते वय लक्षात घेता, ही जागा कीर्तिकरांसाठी अनुकूल नसल्याची माहिती सर्व्हेतून समोर आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या जागेवर महायुतीकडून फोकस केलं जात आहे. भाजप ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहे, पण शिवसेना शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. या ठिकाणी पर्यायी उमेदवाराची चाचपणी महायुतीकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यातच गजानन कीर्तिकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेतूनच विरोध होत आहे. तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रयोगानंतर अनेक मतदारसंघात राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे या बदललेल्या गणिताचा विचार करत भाजपने सर्वाधिक लक्ष हे मुंबईवर केंद्रित केलं असून, मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. दरम्यान, महायुतीच्या लोकसभा जागावाटपानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणाला डच्चू मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT