Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde: आधी पक्ष, नंतर धनुष्यबाण अन् आता मशाल; शिंदे गटाकडून ठाकरेंच्या प्रचार गीतावर आक्षेप

सरकारनामा ब्यूरो

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने मशाल गीतही लॉन्च केलं. परंतु आता ठाकरे गटाच्या या प्रचाराच्या गाण्यावर शिवसेना शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तर 'उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल म्हणायला लाज वाटते का?' असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या प्रचार गीतामध्ये "शिवसेनेची मशाल"हा शब्द वापरण्यात आला आहे. या शब्दावर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उबाठाची मशाल बोलायला लाज वाटते का? असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करत मशाल गीतदेखील लॉन्च केलं. या गाण्यात शिवसेनेची मशाल असा शब्द आहे. हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! असे शब्द या गाण्यात आहेत. तसेच हे गीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत प्रचार गीत असल्याचंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.

मशाल गीत लॉन्च करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मशालीच्या तेजाने जुमलेबाजी आणि भ्रष्ट राजवट जळून खाक होईल याची मला खात्री आहे. आपलं नवं मशाल चिन्ह घरोघरी घेऊन जा असं आवाहन ठाकरेंनी यावेळी केलं. पंरतु आता ठाकरेंच्या या गीतावर शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने ठाकरे गटाला हे चिन्ह बदलावं लागणार की ते कायम राहणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आधी पक्ष, नंतर चिन्ह अन् आता प्रचाराचं गाणं

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना हे नावं आणि शिवसेनेची ओळख असणारा धनुष्यबाण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना नावासाठी न्यायालयात मोठा संघर्ष करावा लागला होता, परंतु त्यांना या लढ्यात अपयश आले.

त्यानंतर त्यांना शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावं स्वीकारावं लागलं. नावाप्रमाणे ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाण गेला आणि त्यांना मशाल पकडावी लागली. परंतु आता मशाल चिन्ह घेतल्यानंतरही 'शिवसेनेची मशाल' या शब्दावर शिंदे गटाने आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT