shrikant shinde sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli Lok Sabha 2024 : कल्याण जिंकण्यासाठी शिंदेंना करावी लागणार कसरत, तर महाविकास आघाडीला....

Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, यावर भाजप पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे. पण...

सरकारनामा ब्युरो

Kalyan Dombivli Lok Sabha : महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadila ) उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एकहाती जिंकत हॅटट्रिक साधण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची मनोमिलन घडवून आणत मनसेला आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या राष्ट्रवादीला जवळही करावे लागणार आहे.

दिवा येथे भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी यावर एकमत झाले. यानंतर दिवा शहरातील भाजप पदाधिकारी यांना एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, "कल्याण लोकसभा हा भाजपसाठी पोषक वातावरण असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन, त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी."

युवासेनेचा भाजप पदाधिकाऱ्यांना टोला

यानंतर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत भाजप पदाधिकारी आणि खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्यात एक बैठक आणि मेळावा पार पडला. तर, दुसरीकडे दिव्यातील भाजप पदाधिकारी यांना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना स्टाइलने उत्तर देत टोलाही हाणला. "ही निवडणूक शिवसेना चिन्हावर लढवली जाईल आणि जिंकलीही जाईल. काही जण पोकळ प्रसिद्धीसाठी अशीच पत्रं देत असतात," असं म्हात्रेंनी म्हटलं.

"श्रीकांत शिंदेंना हॅटट्रिक खासदार करण्यासाठी आनंद"

मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेत शिंदे यांची बाजू भक्कम मांडत सांगितले, "कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव 'एनडीए'चे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेत आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना हॅटट्रिक खासदार करण्यासाठी सगळ्यांना फार आनंद आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार गट नाराज

त्यासह मंत्री चव्हाण यांनी डोंबिवलीसारखी बैठक उल्हासनगर आणि अंबरनाथमध्येही घेतली. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघात अशी बैठक झाली नाही. त्यामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड याचे समर्थक आणि कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी खासदार शिंदे यांना मदत करत नसल्याचे स्पष्ट होत आहे. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गायकवाड यांच्या बॅनरवर शिंदे फोटो लावत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी या कल्याण पूर्व मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे खा. शिंदे पुढे त्यांच्याहेही आव्हान असू शकते, तर दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ज्या प्रकारे स्थान दिले पाहिजे, तसे दिले जात नाही. हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या बोलण्यावरून हे सिद्ध झाले आहे.

राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना सल्ला

राज ठाकरे यांना मानणार मोठा वर्ग कल्याण लोकसभेत आहे, तर मनसे एकमेव आमदार राजू पाटील याच लोकसभेतील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले आहेत. या सर्वं घडामोडी पाहता खा. शिंदे यांना मनसेला जवळ करावे लागणार आहे. याच घडामोडीवरून मनसे आमदार पाटील यांनी श्रीकांत शिंदेंना एक सल्ला देत म्हटलं, "कोणी कितीही आटापिटा केला तरी, या वेळी कल्याण लोकसभेतील उमेदवार यांनी या वेळी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची भाषा कोणत्याही उमेदवाराने करू नये. या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे, तर निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे."

महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

कल्याणमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही. तरी लोकसभा एकहाती जिंकण्यासाठी आणि हॅटट्रिक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेला सोबत घेऊन मोठा विजय होऊ शकतो असे जाणकारांचे मतं आहे, त्यामुळे खासदार शिंदे आणि महायुती हे कसे हॅन्डल करणार हे पाहावे लागेल.

एकूण मतदार : 20 लाख 18 हजार 958

पुरुष मतदार : 10 लाख 85 हजार 710

महिला मतदार : 9 लाख 32 हजार 510

इतर मतदार : 738

सध्याचे खासदार : डॉ. श्रीकांत शिंदे

इच्छुक उमेदवार -

श्रीकांत शिंदे (शिंदे शिवसेना )

वरुण सरदेसाई (ठाकरे गट )

केदार दिघे ( ठाकरे गट )

सदा थरवळ ( ठाकरे गट )

2019 मधील मतदान -

युतीची मतं - 5 लाख 59 हजार

आघाडीची मतं - 2 लाख 15 हजार

कल्याण लोकसभेत मनसे मतदार (अंदाजे ) :

सुमारे 1 लाख 50 हजार

महत्त्वाचे मुद्दे - रोज मध्य रेल्वे उशिराने, लोकल फेऱ्या वाढत नसल्याने प्रवशांना त्रास, पाणी समस्या, प्रदूषण, संथ गतीने चालणारी पुलांची कामे आणि अनधिकृत बांधकामे.

कल्याण लोकसभा यातील विधानसभा आणि आमदार -

कळवा - मुंब्रा - आमदार जितेंद्र आव्हाड ( शरद पवार गट )

कल्याण ग्रामीण - आमदार राजू पाटील (मनसे )

डोंबिवली - आमदार रवींद्र चव्हाण ( भाजप )

कल्याण पूर्व - आमदार गणपत गायकवाड ( भाजप )

उल्हासनगर - आमदार कुमार आयलानी (भाजप )

अंबरनाथ - आमदार डॉ. बालाजी किणीकर ( शिवसेना शिंदे गट )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT