vaishali darekar shrikant shinde sarkarnama
मुंबई

Kalyan Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाने टाकला वेगळाच पत्ता, कल्याण लोकसभेत डाव कसा रंगणार?

शर्मिला वाळुंज

कल्याण लोकसभा मतदारसंघात ( Kalyan Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांचेच नाव चर्चिले जात आहे. शिंदे यांना प्रतिस्पर्धी म्हणून तगड्या उमेदवारास येथे ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यापासून ते सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, केदार दिघे, सुभाष भोईर यांच्यापर्यंत नावाची चर्चा होती. ठाकरे गटाने यातील एक पत्ता टाकल्यास कशी लढत द्यायची, याची पूर्ण तयारी शिंदे गटाच्या सोशल मीडियानं केली होती. मात्र, ठाकरे गटाने वेगळाच पत्ता उघड करत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करत सामान्य चेहऱ्याला संधी देऊ केली आहे.

वैशाली दरेकरांच्या ( Vaishali Darekar ) नावाने शिंदे गटदेखील आश्चर्यचकित झाला असून, ठाकरे गटाने निवडणूक रिंगणात टाकलेला हा पत्ता खरा की खोटा, ठाकरे गट पुढे काय वेगळा डाव टाकतो का? याचीदेखील चाचपणी शिंदे गटाकडून केली जात असल्याची जोरदार चर्चा कल्याणमध्ये रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आपल्याबरोबर आलेल्या खासदारांना तिकीट मिळवून देत आपल्याच बालेकिल्ल्यात आपले आणि मुलाचे स्थान अबाधित राखण्याचा आटापिटा मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. या ठिकाणी भाजपकडूनच त्यांची अडचण केली जात असून, ठाकरे गट या सर्व गोष्टींचा फायदा उचलू पाहत आहे. खासदार शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार दिला जाईल, असे बोलले होते. त्यासाठी आदित्य ठाकरे ( Aadity Thackeray ), वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ), सुषमा अंधारे ( Sushma Anadhare )अशा बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा करण्यात आली. तसेच शिंदेंवर नाराज असलेले सुभाष भोईर ( Subhash Bhoir ) यांचेदेखील नाव अग्रस्थानी होते. तसेच, केदार दिघे ( Kedar Dighe ) यांच्या नावाची नंतर शक्यता वर्तविली जात होती.

आपल्या विरोधात ठाकरे गटाने यापैकी एकास उमेदवारी दिली, तर आपण निवडणुकीच्या रिंगणात त्यांना कसे सामोरे जायचे, याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. शिंदे गटाच्या सोशल मीडियानं वरुण सरदेसाई, केदार दिघे, सुषमा अंधारे यांचा पूर्ण अभ्यास करून ठेवला होता. कोणत्या वेळी कोणते पत्ते उघडे करायचे याचीदेखील चाचपणी सुरू झाली होती.

ठाकरे गटाकडूनदेखील येथे कोणता उमेदवार द्यायचा, याचा अभ्यास सुरू होता. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाचा विचार ठाकरे गटाने केला होता. तसेच, सुभाष भोईर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होत असताना खुद्द भोईर यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती ठाकरे गोटातून आली आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नावाने महिला उमेदवार, एक सुशिक्षित, उत्तम श्रोता व सामान्य स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार ठाकरे गटाने दिल्याचा प्रचार केला जात आहे.

दरेकरांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांत तसेच इतर इच्छुक उमेदवारांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. पण, यावर सध्या उघडपणे बोलण्यास कोणी तयार नाहीत. सामान्य चेहरा असला तरी अती आत्मविश्वास न बाळगता ठाकरे गटाच्या या नवख्या उमेदवाराला सामोरे जायची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याची चर्चा आहे.

तर, दुसरीकडे ठाकरे गटाने टाकलेला हा पत्ता खरा की खोटा, ऐनवेळेला ठाकरे गट आपला पत्ता बदलत खासदार शिंदे यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान निर्माण करतील, असे जाणकारांचे मत आहे. आता ठाकरे गट याच पत्त्यावर आपला डाव रंगवते की पत्ता फिरवत शिंदे गटासमोर वेगवेगळी आव्हान निर्माण करते हे पाहवे लागेल.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT