Mumbai News : महायुतीत जागा वाटपाबाबत अस्वस्थता आहे. महायुतीमधील प्रमुख तिन्ही पक्षांमध्ये जागा खेचाखेचावर अधिक भर आहे. यावरून तिन्ही पक्षातील प्रमुख नेते, आमदार उघडपणे विधान करत आहेत.
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी महायुतीमधील जागाबाबत मोठं विधान करत भाजपकडे सर्वाधिक जागा राहतील आणि लढेल देखील, असं स्पष्ट केलं. माधव भंडारी यांनी हे विधान करताना जागा वाटपावर विधान करणाऱ्या उत्साही आमदारांना फटकारल्याने महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चलबिचल झाली आहे.
भाजपचे (BJP) प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, "विद्यमान आमदार ज्यांचे आहेत, त्या जागा आम्ही लढवणार आहोत. कोण काय सर्व्हे करतो हे फार महत्त्वाचे नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपली भूमिका जाहीपणे व्यक्त न करता आपपाल्या नेत्याकडे व्यक्त करावी, मांडावी. वरि्ष्ठ नेते एकत्रित चर्चा करतील. निर्णय घेतील". मात्र विद्यमान आमदार जिथ आहेत त्या जागा त्यांनाच मिळतील, असेही भंडारी यांनी म्हटले.
बांगलादेशातील स्थितीवर माधव भंडारी यांनी भारत सरकारची भूमिका मांडली. बांगलादेशाची राजकीय स्थिती स्थिर राहावी, तेथील हिंदुना संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारची सकारात्मक भूमिका राहिली आहे. या यश देखील आले आहे. भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दिशेने आहे. अमेरिका, चीन या दोन देशांबरोबर रशिया आणि भारत हे देश अग्रेसर आहे. त्यामुळे भारत संपविण्याच्या कट अमेरिका आणि चीनकडून होत आहे. त्यामुळेच अमेरिकेत अनेक वर्ष आश्रय घेतलेल्या महम्मद युनुसला काळजीवाहू पंतप्रधान बनविण्यात आल्याचे माधव भंडारी यांनी सांगितले.
काँग्रेसचे (Congress) सलमान खुर्शीद यांच्यावर माधव भंडारी चांगलेच संतापले. बांगलादेशाप्रमाणे भारतात देखील राजकीय अस्थिरता माजेल आणि पंतप्रधानाच्या निवासस्थानीदेखील जनतेच्या झुंडी शिरतील, यासारखे मत उघडपणे काँग्रेसचे सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले. मात्र भारतीय जनता सुजाण असून काँग्रेसच्या विचारसरणीची पाठराखण जनता करणार नाही, असा दावा केला. बांगलदेशातील हिंदू आणि मुस्लिम निर्वासित म्हणून भारतात येणार असतील, तर समस्या वाढतील. यामुळे बांगलादेशाचा विषय भारतासाठी महत्त्वाचा आहे, असेही माधव भंडारी यांनी म्हटले.