Pune Traffic Issues Highlighted in Maharashtra Assembly Sarkarnama
मुंबई

Assembly Session : तुम्ही पुण्याचे असला तरी..! अधिवेशनात वाहतुकीच्या प्रश्नावर सबकुछ पुणेकर, भास्कर जाधव चेतन तुपेंवर संतापले

Pune Traffic Issues Highlighted in Maharashtra Assembly : भाजपचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांनी वाहतुकीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी आणली होती.

Rajanand More

बातमीत थोडक्यात काय?

  • पुण्यातील वाहतुकीच्या अराजकतेचा मुद्दा विधानसभेत ऐरणीवर

  • भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाहतूक कोंडी, नियोजनाचा अभाव आणि अनिश्चिततेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

  • राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली, परंतु विरोधी आमदारांनी इतर मुद्द्यांवर चर्चा न झाल्याने असंतोष व्यक्त केला.

Political Tensions Surface Amid Transport Discussion : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गुरूवारी पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता हा प्रश्न मांडणारे, समस्या सांगणारे सर्व आमदार महायुतीचे होते. पुण्यातील वाहतुकीची समस्या म्हणजे अराजकतेची स्थिती, कसलीही शाश्वती नाही, अशा शब्दांत आमदारांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. त्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तरे दिली. त्यावेळी चेतन तुपे हे तालिका अध्यक्ष होते.

भाजपचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांनी वाहतुकीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी आणली होती. त्यांनी त्यांच्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासह शहरातील विविध समस्यांसह वाहतुकी कोंडीच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर एकापाठोपाठ एक भाजप आमदारांची रांगच लागली.

आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, हेमंत रासने या भाजप आमदारांसह शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनीही पुण्यातील वाहतुकीचे अनेक प्रश्न प्रश्न उपस्थित केले. आमदार कुल यांनी तर पुण्यात अराजकतेची स्थिती असल्याचे, कसलीही शाश्वती नसल्याचे विधान केले.

पिंपरी चिंचवडमधील आमदार शंकर जगताप यांनीही त्यांच्या भागातील समस्या सांगितली. एवढेच नाही तर पुण्याबाहेर आमदार तेही भाजपचे प्रशांत बंब यांनीही काही प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना पुण्यातील आमदार व मंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तरे दिली. एकीकडे बराच वेळ ही चर्चा सुरू असताना विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अखेर या नेत्यांचा संयम संपला.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तालिका अध्यक्ष चेतन तुपेंवर चांगलेच संतापले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार की नाही, असा संतप्त सवाल करत ते म्हणाले. दोन लक्षवेधी अडीच तास सुरू आहेत. काय चालंलय. हे कुठल्या नियमांत बसते. हे बरोबर नाही. तुम्ही पुण्याचे असला तरी एकट्या पुण्याला तुम्हाला न्याय देता येणार नाही, असे विधान जाधव यांनी केले.

आमदार अर्जून खोतकर यांनी त्यावर आक्षेप घेत ते कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्याआधी चर्चेदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सगळे पुणेकर असून हा प्रश्न का लांबतोय. या प्रश्नाला सगळे मिळून न्याय देतील. त्यामुळे तिसरी लक्षवेधी घ्यावी, अशी विनंती तालिका अध्यक्षांना केली होती.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न : पुण्यातील वाहतूक प्रश्नाचा विधानसभेत कसा मुद्दा उपस्थित झाला?
    उत्तर : भाजप आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडला.

  • प्रश्न : वाहतूक समस्यांवर कोणत्या पक्षांचे आमदार बोलले?
    उत्तर : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार या चर्चेत सहभागी झाले.

  • प्रश्न : या चर्चेत कोणती भावना व्यक्त झाली?
    उत्तर : आमदारांनी पुण्यात अराजक स्थिती असल्याची भावना व्यक्त केली.

  • प्रश्न : विरोधी पक्षातील आमदारांनी कोणता आक्षेप घेतला?
    उत्तर : शेतकरी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होत नसल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT