
Maharashtra Politics : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आतापर्यंत अनेक धक्के बसले आहेत. असेच दोन हादरे 20 वर्षांपूर्वी बसले होता. तारीख होती 3 जुलै अन् 18 डिसेंबर 2005... स्वत: बाळासाहेब ठाकरेंनी 3 जुलैला घोषणा केली अन् पक्षातील ताकदवान नेता शिवसेनेपासून वेगळा झाला. तो नेता म्हणजे नारायण राणे. तर 18 डिसेंबरला राज ठाकरे बाहेर पडले. या दोन्ही घटनांना 20 वर्षे झाली. तेव्हा शिवसेना हादरली होती... पण 20 वर्षांनंतर ठाकरेंना सुखावणारी घटना घडत आहे.
अनेक धक्क्यांतून सावरत मराठी माणसांसाठी सुरू झालेली शिवसेना नावाची संघटना आजही महाराष्ट्रात आपली ताकद टिकवून आहे. मुळ शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हातात नसला तरी हे नाव अजूनही कोट्यवधी मराठीजनांच्या मनात आहे. मागील काही वर्षांत पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षाचे दोन गट पडले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून मुळ पक्ष गेला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा पक्ष आहे.
आजच्याच दिवशी 20 वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून नारायण राणेंकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. सुरूवातीला काँग्रेस, नंतर महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष आणि आता भाजपच्या व्यासपीठावरून ते ठाकरेंवर टीका, गंभीर आरोप करत असतात. उद्धव ठाकरेंमुळे त्यांना शिवसेना सोडावी लागल्याचे ते वारंवार सांगतात. बाळासाहेब ठाकरेंनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली होती. त्या दिवसाची खदखद आजही राणेंच्या बोलण्यातून बाहेर पडत असते. सगळा दोष ते उद्धव ठाकरेंना देतात.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडूनही राणे पिता-पुत्रावर ठाकरी शैलीत आसूड ओढले जातात. ठाकरे विरूध्द राणे यांच्यातील शाब्दिक चकमकीचा सामना महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. तो यापुढेही सुरूच राहणार, हे वेगळे सांगायला नको. पण 20 वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राणेंनंतर राज ठाकरेंनीही शिवसेना सोडली अन् महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष काढला. पण अजूनही या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारण जम बसविता आलेला नाही.
शिवसेना फुटीनंतर अनेक शिलेदार उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत. त्यांचा पक्ष खिळखिळा झाला आहे. दररोज नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्याच्या बातम्या येत आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या त्यांच्या पक्षाला सुखावणारी अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्वाची घटना याच महिन्यात म्हणजे ५ जुलैला घडत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. हे राजकीय व्यासपीठ नसले तरी मराठीच्या मुद्द्यावरून ते एकत्र हुंकार भरणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या या विजयी मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, कोणत्याही पक्षाचे लेबल नसेल, केवळ मराठीचा गजर असेल. काही महिन्यांवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत असणार आहे ती, मुंबई महापालिकेत. मुंबईत ठाकरे ब्रॅंड कायम ठेवायचा असेल तर त्यांना पुन्हा सत्ता मिळवावीच लागणार आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही बंधू मराठी भाषेच्या निमित्ताने एकाच मंचावर येत असल्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं लक्ष या घटनेकडे लागले आहे.
नारायण राणेंकडून मात्र उद्धव ठाकरेंवर त्यावरूनही सडकून टीका सुरूच आहे. राज ठाकरेंबाबत मात्र ते बोलण्याचे टाळतात. दोघे शिवसेनेत असताना त्यांच्यात चांगलेच सख्य होते, हे अनेकदा राणेंनीही बोलून दाखवले आहे. पण उद्धव ठाकरेंबाबतचा त्यांचा राग 20 वर्षांनंतर अधिकच टोकाचा झाला आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्यातील वाद पेटले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळावा म्हणजे राणेंसाठी आगीत तेल ओतण्यासारखेच असेल. तर ठाकरेंना सुखावणारा...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.