Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Thackeray Group: ठाकरेंनी फुटीरांविरुद्ध रान पेटवले, मात्र 'टेम्पो' टिकवण्याचे आव्हान...

Sachin Waghmare

शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या काळात दोन्ही गटांतून आडवा विस्तवही जात नाही. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. त्यातच गेल्या दीड वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात सर्वत्र रान पेटवले होते. या कामात फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली होती. फुटीर आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद मोठा होता. त्यामुळे फुटीरांचे धाबे दणाणले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा 'टेम्पो' टिकवता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातून केली होती. बुलडाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर हे शिंदे गटात गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळावा घेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले होते. शेतकरी मेळाव्यात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चौफेर टीका करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उद्धव ठाकरे यांनी सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांची सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ तुटली नाही, हे दिसून आले.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी व अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. खासदार भावना गवळींवर टीका करताना आपल्या पलीकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. त्यांना शिवसेनेने अनेकदा खासदार केले. मात्र, ताईंना धमक्या आल्या. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक झाली, पण ताई मोठ्या हुशार निघाल्या. ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला आणि मग तो फोटो छापून आल्यावर ताईंवर कारवाई करण्याची ईडी-सीबीआयवाल्यांमध्ये हिंमत आहे का? आणि त्या तिकडे गेल्यावर त्यांना संरक्षण मिळाले, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुन्या शिवसैनिकांना पुढे आणत घेरण्याचे प्रयत्न

बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांच्या जवळचे काही पदाधिकारी त्यांच्या सोबत शिंदे गटात गेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजही ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे खासदार, आमदार शिंदे गटासॊबत असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते ठाकरे गटात अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि आमदारांना घेरण्यासाठी जुन्या शिवसैनिकांना पुन्हा पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ताकद निर्माण करण्यासाठी रणनीती

बुलडाणा जिल्हा तसा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. सहा टर्मपासून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून येतो. जाधव हे तिसऱ्यांदा लोकसभेवर गेले आहेत. त्यांच्या आधी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनीही जिल्ह्याचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. बुलडाणा नियमितपणे शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंसाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाने या ठिकाणी पुन्हा ताकद निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT