Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session 2024 : जरांगेंची मागणी सगेसोयऱ्यांबाबत अधिवेशनात काय निर्णय होणार?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Maharashtra Budget 2024 Announcements in Marathi : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, ते आरक्षण नामंजूर करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली. अधिसूचनेप्रमाणे सगेसोयऱ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. सगेसोयऱ्यांच्या आरक्षणावर अडून राहिलेल्या जरांगेंच्या मागणीवर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय निर्णय होणार, याकडे लक्ष आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आजपासून सुरू झाले. शोक प्रस्तावानंतर अधिवेशनाचा पहिला दिवस आटोपला. एकूण पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेराव घालण्याची संधी असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी, मराठासह अन्य समाजासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असून, या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी समाजाच्या सगेसोयरे व्याख्येच्या अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेते? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडायला विरोधक आक्रमक झालेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation), पोलिस ठाण्यात गोळीबार, लोकप्रतिनिधीची हत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पुण्यात सापडलेले ड्रग्ज, कांदा निर्यातबंदी, निवासी डॉक्टरांचा संप, यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला वेढण्याच्या तयारीत आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे यांनी आरोप केले होते. एकीकडे सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं असताना दुसरीकडे मनोज जरांगे मात्र ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षणासाठी ठाम असल्याचे दिसत आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) हात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT