The image shows a press briefing on the sudden postponement of civic elections in 12 Maharashtra districts. The scene highlights rising political tension surrounding the Maharashtra civic polls. Sarkarnama
मुंबई

Local Body Election : 'निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलून घातलेला गोंधळ अन् घोळ नियोजनबद्ध, फडणवीसांनी नाटक रंगवलं, पण तिसरा अंक फसला...'

Maharashtra Local Body Election Postponed : 'निवडणूक आयोगाने 12 जिह्यांतील निवडणुका पुढे ढकलून गोंधळ घातला नसता. हा गोंधळ आणि घोळ नियोजनबद्ध आहे. भाजपला लाभ व्हावा हाच त्यामागचा हेतू आहे. मुख्यमंत्री फडणवीस कधी नव्हे ते राज्य निवडणूक आयोगावर गरजले. नाटक चांगलेच रंगवले, पण...'

Jagdish Patil

Mumbai News, 02 Dec : राज्य निवडणूक आयोगाने 12 जिह्यांतील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आयोगाच्या याच निर्णयावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आयोगावर आणि महायुतीवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवाय सामनातून निवडणूक आयोगाच्या भूमिकवर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका काही तासांवर आल्या असताना आयोगाने 12 जिह्यांतील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आयोगास अशा पद्धतीने तडकाफडकी निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला हे आश्चर्यकारक आहे.

246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी होणार होती. आता न्यायालयाचे कारण देत 12 जिह्यांत 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल लागतील. निवडणूक आयोगाने हा ठरवून घातलेला घोळ आहे. मुख्यमंत्र्यांनी या घोळाबद्दल आयोगाचे कान उपटले, पण मुख्यमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर असलेला निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय निवडणुका पुढे ढकलू शकेल काय?, असा सवाल सामनातून केला आहे.

तर राज्यातील नगरपालिका नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात. तेव्हा काही निवडणुका ऐन वेळी पुढे ढकलण्याचा घोळ घालण्यामागे नगरविकास खात्याची काही भूमिका आहे का? असा सवालही सामनात उपस्थित केला. राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराची सांगता होत असताना व मतदानाची तयारी सुरू असताना निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात, हे संशयास्पद आहे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक, पुणे भागातील महत्त्वाच्या नगरपालिका आणि नगर पंचायती यात आहेत.

या निवडणुकीत सत्ताधारी तीन पक्षांत स्पर्धा आहे व प्रचारास व मतदारांपर्यंत पोहोचण्यास वेळ कमी पडत असल्याने पुढील ‘सेटिंग’ला भरपूर वेळ मिळावा म्हणून सरकारचे हस्तक असलेल्या आयोगाने निवडणुका पुढे ढकलून भाजपला मदत केली काय? अशी शंका घेण्यास जागा आहे, असंही सामनात लिहिलं आहे.

दरम्यान, बदलापूर, अंबरनाथ या ठाणे जिह्यातील निवडणुकाही स्थगित झाल्या. येथे भाजप व मिंधे गटात फोडाफोडीचे राजकारण रंगले होते. आता ही निवडणूकच भाजपने ‘हायजॅक’ केली. राजकीय पक्ष आणि मतदारांना संभ्रमात टाकणारा हा निर्णय आहे. एरवी निवडणूक आयोग चिखलात बसलेल्या म्हशीसारखा निष्क्रिय पडलेला असतो, पण निवडणुकांना स्थगिती देताना आयोगाने जी सक्रियता दाखवली ती थक्क करणारी आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने आयागाला टोला लगावला आहे.

आयोगाच्या निर्णयाचा फटका प्रमुख नगरपालिकांना बसला आहे. शिवाय आयोगाचा हा निर्णय म्हणजे राज्यातील ढिसाळ कारभार व अनागोंदीचे हे प्रताप असून संपूर्ण राज्याला वेठीस धरण्याचा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण सरकार, स्वतः मुख्यमंत्री व त्यांचे दोन्ही ‘उप’ हे प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे प्रश्न वाऱ्यावर सुटले आहेत.

या निवडणुका संपून सरकार कामाला लागेल असे वाटत असतानाच काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एकतर सत्ताधारी पक्षाने या निवडणुकांसाठी प्रचंड ‘थैल्या’ रिकाम्या केल्या व मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभही झाला. आता निवडणुकाच पुढे गेल्याने हा खर्च वाढेल. नव्याने लक्ष्मीदर्शन करून मतदारांना मतदानास न्यावे लागेल.

गेल्या चार दशकांतील अत्यंत महागड्या व भ्रष्ट निवडणुका म्हणून या निवडणुकांकडे पाहावे लागेल. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. कर्जाच्या ओझ्याने महाराष्ट्र वाकला आहे, पण नगरपालिका निवडणुकीत कोटी-कोटी रुपयांची उधळण व मतदार विकत घेण्याची स्पर्धा सत्तापक्षांमध्येच सुरू आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुख्यमंत्री व दोन ‘उपट’ हवी तशी आश्वासने लोकांना प्रचार सभांतून देत आहेत.

पुन्हा त्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारी तिजोरीत पैसे कुठे आहेत? अर्थात, सरकारी तिजोरीत पैसे नसले तरी सत्ताधाऱ्यांच्या खासगी तिजोऱ्या भक्कम आहेत व त्यावरच निवडणुकांचा खेळ चालला आहे. निवडणूक आयोग या खेळातला एक जोकर आहे. सरकार, खास करून भाजपने निवडणूक आयोगाचा जोकर केला.

तसे नसते तर मतदार मतदानासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ घेत असताना निवडणूक आयोगाने 12 जिह्यांतील निवडणुका पुढे ढकलून गोंधळ घातला नसता. हा गोंधळ आणि घोळ नियोजनबद्ध आहे. भाजपला लाभ व्हावा हाच त्यामागचा हेतू आहे. मुख्यमंत्री फडणवीस कधी नव्हे ते राज्य निवडणूक आयोगावर गरजले. नाटक चांगलेच रंगवले, पण तिसरा अंक फसला आहे. लक्ष्मीदर्शनाच्या खेळात आयोगही गुंतला, अशा शब्दात सामनातून निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT