Malvan Nagarparishad Election Update : राज्यभरात आज (ता.02) नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी मालवणध्ये नाकाबंदीत एका कारमध्ये तब्बल दीड लाखांची रोकड सापडली आहे. सापडलेली कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार राणे निलेश यांनी निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप करत थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या घातला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणमध्ये मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान मालवण पोलिसांना एका कारमध्ये काही रोख रक्कम सापडली. ही कार देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकार यांची असल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर पोलिसांनी ही कार अधिक तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणली.
त्यानंतर मालवण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि सबंधित कार मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा घेतला, त्यामुळे काही काळ पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
तर निलेश राणे यांनी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप करत आपण पोलीस ठाण्यात जाईपर्यंत पोलिसांनी तक्रारही दाखल केली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा गंभीर आरोप देखील राणे यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, पोलिसांनी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी गाडी पोलीस स्टेशनला आणली. त्यानंतर मी सव्वा एकला पोलीस ठाण्यात आलो, तोपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती, निवडणूक अधिकारी आले नव्हते. मी आल्यानंतर ते अधिकारी आले. तसंच भाजपच्या लोकांना जे सोडवायला आले होते त्यांच्या गाडीला नंबरप्लेट नव्हती.
मात्र गाडीत भाजपचा गमछा होता. त्यामुळे आता या गाडीवर देखील पोलिसांनी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून निलेश राणे विरूद्ध भाजप असा वाद मालवणमध्ये पाहायला मिळत होता. तो काल रात्रीच्या प्रकरणामुळे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.