Mahavikas Aaghadi | Liquor Sale
Mahavikas Aaghadi | Liquor Sale Sarkarnama
मुंबई

ठाकरे सरकार 'मालामाल' : मद्यविक्रीतून मिळालं रेकॉर्डब्रेक उत्पन्न पण टार्गेट हुकलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना (Covid-19) आणि लॉकडाऊनमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून राज्य सरकारची (Maharashtra Government) तिजोरी आता सावरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. कारण राज्यातील ठाकरे सरकार २०२१-२२ या आर्थिक वर्षात मद्यविक्रीच्या माध्यमातून मालामाल झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ मध्ये मागील ३ आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल गोळा केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी वितरीत करावा लागला होता. अशातच नैसर्गिक आपत्तींमुळे तिजोरीवर मोठा बोजा निर्माण झाला होता. या काळात इतर उद्योग-व्यवसायांवर बंधन असल्यामुळे राज्य सरकारसाठी हक्काचे उत्पन्नाचे साधन म्हणून पेट्रोल-डिझेलवरील कर आणि मद्यविक्रीतील महसूलाचा समावेश होता. याच मद्यविक्रीत आता २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली असून २०२१- २२ या आर्थिक वर्षातील वाढ १७ टक्क्यांची आहे.

२०२१- २२ या आर्थिक वर्षात तब्बल १७ हजार १७७ कोटी रुपयांची दारु विक्री झाली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल २ हजार कोटी रुपयांची आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊनही राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपले टार्गेट गाठता आलेले नाही. विभागाने २०२१- २२ या आर्थिक वर्षात १८ हजार कोटी रुपयांच्या दारु विक्रीचे टार्गेट ठेवले होते. पण हे टार्गेट ५ टक्क्यांनी हुकलं आहे.

महाराष्ट्रात २०१९-२० मध्ये २ हजार १५७ लाख लीटर दारुविक्री झाली. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसून २०२०-२१ मध्ये हा आकडा १ हजार ९९९ लाख लीटर पर्यंत खाली आला होता. पण २०२१-२२ मध्ये यात पुन्हा एकदा वाढ झाली असून या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल २ हजार ३५८ लाख लीटर दारूची विक्री झाली आहे. याशिवाय २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय बनावटीच्या विदेशी दारुसोबतच बिअर, देशी दारु आणि वाईन विक्रीतही मोठी वाढ झाली. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये बिअरच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये यामध्ये २२ टक्क्यांची घट झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT