Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing Case : त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होती; पण आयत्या वेळीच्या निरोपाने कार्यकर्ते हिरमुसले

Mahesh Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाडांचे महेश गायकवाडांवरील गोळीबाराचे प्रकरण

Bhagyashree Pradhan

Kalyan Political News :

आज कल्याण पूर्वेला जल्लोष होणार होता, फटाक्यांची आतषबाजी होणार होती, याचे बॅनर-होर्डिंग्ज लागले होते, पण अचानक हे सर्व थांबलं. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं कारण...

शिवसेनेचे (शिंदे) कल्याण पू्र्वचे शहराध्यक्ष महेश गायकवाड तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर कल्याणमध्ये परतणार होते. त्यासाठी त्यांचे कल्याणमधील कार्यालयही सजवण्यात आले होते. संपूर्ण शहरात 'टायगर इज बॅक', 'भावी आमदार' असे बॅनर झळकत होते. मात्र, महेश गायकवाड यांना आणखी उपचाराची गरज असल्यामुळे डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांचं कल्याणमधील आगमन लांबणीवर पडलं आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार (Crime) केला होता. त्यात महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते. त्यांना त्याच रात्री ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पहिले दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज मिळणार अशी चर्चा होती. म्हणूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार केली होती.

कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले, फटाक्यांची तयारी केली. महेश गायकवाड बरे होऊन पुन्हा कल्याणमध्ये परतणार असल्याने कार्यकर्ते खूष होते, पण अजून एक-दोन दिवस आरामाची गरज असल्याचे सांगून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला नाही. त्यामुळे जल्लोषाच्या मूडमध्ये असलेले कार्यकर्ते हिरमुसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय घडलं होतं?

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा द्वारली गावातील जाधव कुटुंबीयांसोबत जमिनीचा वाद होता. आमदार गायकवाड यांनी जमीन हडपल्याचा आरोप जाधव कुटुंबीयांनी केला होता, तर जाधव कुटुंबीयांचे पैसे दिल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला होता.

या वादातून हे प्रकरण थेट उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात गेले. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडदेखील हजर झाला होता. या वेळी वैभव यांची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवून घेत नसल्याचे पाहताच त्यांनी घडलेला सर्व प्रकार आमदार गणपत गायकवाड यांना फोन लावून सांगितला.

आमदार गणपत गायकवाड पोलिस ठाण्यात आले तेव्हा महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये बसले होते. त्याच केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाडदेखील बसण्यासाठी गेले. पाच मिनिटे बसल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल जगताप बाहेर काय सुरू आहे हे पाहण्यासाठी गेले. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःची रिव्हॉल्व्हर काढून महेश गायकवाड यांच्यावर थेट गोळीबार केला.

डिस्चार्ज लांबणीवर

महेश गायकवाड यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज लांबणीवर टाकला. महेश यांना चालण्यासाठी थोडा त्रास जाणवला. तसेच ऑपरेशन केलेल्या ठिकाणी सूज असल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला नाही, तर राहुल पाटील यांना आज डिस्चार्ज मिळू शकेल.

राजकीय कारण

शिवसेनेचे (Shivsena) आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज्यातील सर्व नेते उपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीतील नेतेही अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महेश गायकवाड यांचं जंगी स्वागत करणे शक्य नाही. म्हणून डिस्चार्ज दोन दिवस पुढे ढकलल्याची चर्चा आहे.

ज्या दिवशी गोळीबार झाला ती रात्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हॉस्पिटलमध्ये घालवली होती. आणि सध्या दोन दिवस ते अधिवेशनात व्यस्त असल्याने डिस्चार्ज लांबणीवर केल्याचे सांगण्यात येते.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT