Ganpat Gaikwad and Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Mahesh Gaikwad : गणपत गायकवाड भाजपचे कार्यकर्ते नाहीत; हॉस्पिटलमधून घरी येताच महेश गायकवाडांचा गंभीर आरोप

Ganpat Gaikwad Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते.

Bhagyashree Pradhan

Kalyan News: कल्याण पूर्वमधील शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हील लाईन पोलिस स्थानकात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

अखेर 24 दिवसांनी आज महेश गायकवाड हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी परतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गणपत गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले. गणपत गायकवाड हे भाजपचे कार्यकर्ते नसून माझा त्यांच्यावर विश्वास नाही, ते संधी साधून भाजपमध्ये आले आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. (Ganpat Gaikwad Firing Case)

गणपत गायकवाड मुळातच 2019 मध्ये संधी साधून भाजपमध्ये आले. ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. भाजपचे असे संस्कार नाहीत. माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. गणपत गायकवाड यांना नक्कीच कठोर शिक्षा मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यायव्यवस्था यावर माझा विश्वास असल्याचं महेश गायकवाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण पूर्वमधील विविध समस्यांचा पाठपुरावा मी करत होतो. प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते. सामाजिक कामातच नव्हे तर माझ्या व्यवसायात देखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या. हा सर्व प्रकार वरिष्ठांना सांगितला होता.

याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला होता. प्रत्येकवेळी त्यांनी माझी समजूत काढली. आपण युतीत आहोत, असे मला सांगण्यात आले. यावेळी मात्र त्यांनी थेट शेतकऱ्यांवरच अन्याय केला. या अन्याविरुद्ध मी आवाज उठवल्याने त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या, असं महेश गायकवाड यांनी सांगितलं.

दरम्यान, माझ्या आईचे, गोरगरिबांचे आशीर्वाद व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांच्या प्रयत्नांमुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आता या पुढे आणखी जोमाने समाजसेवा करणार असल्याचंही यावेळी महेश गायकवाड म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT