Mumbai News, 26 Aug : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, आंदोलनासाठी मुंबईतही धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अशातच आता राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनांबाबत नवे नियम लागू केले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारने सावध पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत त्यांची भेट घेऊन गेले होते. मात्र, चर्चेनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम राहिले आहेत.
शिवाय 29 ऑगस्टचे आंदोलन अंतरवाली सराटीत किंवा गरज पडल्यास मुंबईत करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबईत मोठ्या आंदोलनांची शक्यता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर गृह विभागाने मुंबईतील आंदोलनांसाठी आझाद मैदान हे प्रमुख ठिकाण निश्चित केले आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईत आंदोलन, धरणे किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. आझाद मैदानातही आंदोलनासाठी एका दिवसाचीच परवानगी असेल आणि सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. एका वेळी जास्तीत जास्त पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात येणार आहे.
तसेच आंदोलनासाठी किमान सात दिवस आधी पोलिसांकडे परवानगी मागणे आवश्यक करण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. मोर्चा काढण्याऐवजी आंदोलकांनी थेट आझाद मैदानात जमावे, अशा स्वरूपाचे निर्बंधही घालण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे परवानगीशिवाय लाऊडस्पीकरही वापरता येणार नाहीत. शिवाय आंदोलनासाठी वपारण्याच्या झेंड्याचा आकारही निश्चित करण्यात आला आहे. तसंच मैदानावर पक्के किंवा तात्पुरते तंबू, मंडप उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली असून लाठ्या, तलवारी, बंदुका, भाले किंवा इतर कोणतीही घातक शस्त्रे जवळ बाळगणे, भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागील आंदोलनाच्या वेळी मुंबईतील वाहतूक आणि शहराच्या व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सरकारने हे निर्बंध लागू केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.