Mumbai News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील घरावर ड्रोन फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
जरांगे पाटील यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून ठेवल्या जाणाऱ्या वॉच चा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत त्यावर प्रश्न उपस्थित केले.
आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. परंतू आंदोलन करणाऱ्यांच्या घरांवर ड्रोन फिरविले जात आहेत. आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये रात्रीच्या वेळी चक्क ड्रोन फिरत असल्याने या गावात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाले होत्या. सरकारनामाने देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. रात्रीच्या वेळी या गावात ड्रोन फिरत असल्याने येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक नागरिक त्यामुळे घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे समोर आले होते.
राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. अशा पद्धतीने ड्रोनने लक्ष ठेवले जात असेल तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर ते कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या हक्कासाठी, मागण्यांसाठी आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. ड्रोन फिरत असल्याने अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जरांगे-पाटील यांना संरक्षण द्यावे, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत पोलिसांकडून अहवाल घेणार असल्याचे उत्तर सभागृहात दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.