मुंबई

Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे काय रे भाऊ?

Manoj Jarange Patil : सरकारने 'सगेसोयरी' या शब्दाची केलेली व्याख्या आणि त्याचा अर्थ खास 'सरकारनामा'च्या वाचकांसाठी

सरकारनाम ब्यूरो

दीपा कदम

Mumbai Political News :

मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे-पाटील यांची आग्रही मागणी होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सगेसोयरे' शब्द असलेला अध्यादेश आज (शनिवारी) सकाळी जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या उल्लेखामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले असून संपूर्ण मराठा समाज लढाई जिंकल्याचा जल्लोष करत आहे. (Maratha Aarakshan)

तरीही सर्वांना प्रश्न पडला असेल की, सगेसोयरे म्हणजे काय? याबाबत राज्य सरकारने सगेसोयरेची केलेली व्याख्या पाहुया...

सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक. मराठा समाजात गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे. मात्र, सगेसोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल. तसेच लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत हे पुराव्याच्या आधारे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी गृहचौकशी केली जाईल. हे विवाह सजातीय विवाहातून आणि नातेसंबंध तयार झाले असतील तर त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुणबी जात प्रमाणपत्र कुणाला आणि कोणत्या पुराव्यानुसार मिळणार?

1. कुणबी मराठा जातीची नोंदी असलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते

2. कुणबी नोंद मिळालेल्यांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील नातेवाईक

3. पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, याचा अर्जदाराने शपथपत्र द्यावे लागेल. तसेच गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाईल.

4. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या लोकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या लोकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

5. ज्या मराठा समाजाकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगेसोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

6. कुणबी नोंद मिळालेल्या लोकांच्या राज्याअंतर्गत सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना हे पुरावे सादर करावे लागतील -

अ. कुणबी नोंदीच्या पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.

कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी अखेरीस राज्य सरकारने मान्य केली असून त्याबाबतची अधिसूचना आज (शनिवारी) तातडीने काढण्यात आली. रक्तनात्यात आतापर्यंत जात प्रमाणपत्र दिली जात होती. त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करून यापुढे सगेसोयऱ्यांचा समावेश जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या नियमांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यापुढे कुणबी जातीतील लग्न नातेसंबधातून निर्माण झालेल्या मराठा नातेवाईकांकडे (Maratha Reservation) कुणबी जात प्रमाणपत्र नसेल तरी कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या नातेवाईकाच्या शपथपत्राच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारने काल (शुक्रवारी) प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेवर 16 फेब्रवारीपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून त्यानंतर याची अंमलबजावणी करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयरे यांना देखील कुणबी जातीचे पुरावे नसतानाही जात प्रमाणपत्र दिली जावीत, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र ही मागणी कायद्याच्या कसोटीवर मान्य करता येणार नसल्याने राज्य सरकारनेही ही मागणी पूर्ण करता येणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र आंदोलकांच्या रेट्यामुळे अटीशर्तींसह त्यांची मागणी मान्य केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT