Tushar Doshi, Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : जालन्याचे एसपी तुषार दोशींच्या बदलीवरून खडाजंगी; जरांगे-भुजबळ पुन्हा भिडले

Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यावेळी तुषार दोशी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. आता अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी बदली करण्यात आली. यावरून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दोघांची परस्परविरोधी प्रतिक्रिया आल्याने यावरून वादात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

जालन्यातील अंतरवाली सराटीतील लाठीमाराच्या घटनेनंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. आता त्यांची नियुक्ती पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी करण्यात आली. गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सोमवारी आदेश दिले. त्यात तुषार दोशींचीही बदली झाली आहे.

गृह विभागाच्या या निर्णयावरून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांना मारल्याचं बक्षीस तुषार दोषी यांना मिळालं आहे. निष्पापांवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती दिली जात असेल, तर याची माहिती घेईन. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी बसणार आहे. यातून कोणाचीही सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुषार दोषींना सहनशीलतेचं बक्षीस - भुजबळ

ओबीस आरक्षणाच्या रक्षणासाठी आवाज उठवणारे मंत्री छगन भुजबळ यांनी गृह विभागाची पाठराखण केली आहे. जरांगेंना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिस गेले होते. त्यावेळी पुरुष आणि महिला पोलिसांवर जबरदस्त दगडफेक झाली. त्यात 70 पोलिस कर्मचारी जखमी झाले. आणखी काही गोष्टी ज्या घडू नयेत त्या तिथे घडल्या. या सगळ्याबद्दल ते काहीच लोकांसमोर बोलले नाहीत. त्यांनी संयम ठेवला. सहन केलं. त्या सहनशीलतेचं बक्षीस म्हणून त्यांचं प्रमोशन झालं आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

जालन्यातील लाठीमार हा दुर्दैवी होता. आणि त्यानंतर पोलिसांना झालेली मारहाणही अमानुष होती. अशा घटना टाळता आल्या असता. हे सरकारचं अपयश आहे. सरकारने हे जाणूनबुजून केलं आहे. आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमून किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही अधिवेशनात करू, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT