Maratha Reservation Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Solution : मराठा आरक्षण : राज्य सरकारपुढील अडचणीत वाढ; मार्ग काढण्यासाठी बैठकांचा धडाका

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर सरकारच्या हलचाली वाढल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरून वाढलेला तेढ कमी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होईल. तसेच कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समतीचीही सोमवारी बैठक आहे. या बैठकांच्या धडाक्यात आरक्षणाबाबत काय निर्णय होणार, याकडे राजकीय वर्तुळासह राज्यातील लोकांचे लक्ष आहे. (Latest Political News)

निजामशाहीत नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकारने काढला आहे. यानंतर संबंधित महसुली आणि शैक्षणिक कुणबी नोंदींची कागदपत्रे तपासणीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी बैठक होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकांनंतर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेसाठी उचलेल्या पावलांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, सरसकट मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यावर ठाम राहत उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू ठेवले. यानंतर राज्यातील ओबीसी समाज आरक्षणाच्या कोट्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची ५० टक्के असलेल्या मर्यादेत वाढ करण्याची मागणीही राजकीय वर्तुळातून होत आहे.

'मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याची गरज आहे. घाईगडबडीने आरक्षणाबाबत निर्णय घेणे योग्य होणार नाही. न्यायालयाने आरक्षणासंदर्भात घातलेली ५० टक्केची मर्यादा वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी संसदेत कायदा करावा', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.

मराठा, ओबीसी समाजानंतर आता धनगर समाजही एस.टी. आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने दोन आठवड्यांत राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर समाजाच्या नांदेडमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात आरक्षणासाठी प्रत्येक समाज आक्रमक होत असल्याने सरकारपुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. यावर सरकार काय मार्ग काढणार, याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळांसह लोकांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT