Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तरी देखील त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार केला नसल्याचा जरांगे यांनी आरोप केला आहे.
तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, आमची अपेक्षा होती की गृहमंत्री अमित शाह आझाद मैदानावर जाऊन आंदोलकाना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यांना मराठा बांधवांचं दुःख ऐकण्यासाठी वेळ नव्हता.
महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत आले आहेत आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. अशा परिस्थितीत देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊनही ते आंदोलकांना भेटले नाहीत ही बाब अत्यंत निराशाजनक आहे, असं राऊत म्हणाले.
तर जे गृहमंत्री कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, ते मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांना मराठा समाजाला न्याय देण्याचं श्रेय घेता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शिंदे शेपटी हलवत अमित शहांच्या मागे फिरतात. मराठा समाजाचा इतका गंभीर प्रश्न सुरू असताना, ते दरे गावात जाऊन यज्ञ करायला बसलेत. तुम्ही कसले मराठा? शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका. फडणवीस हे कसले मराठे? हे लोक मराठी माणसासाठी कलंक आहेत.
त्यांना मराठा लोकांची काळजी नाही, उलट मराठी माणसाला संपवण्यासाठीच त्यांचे सरकार इथे आले आहे, अशी जहरी टीका राऊत यांनी यावेळी केली. तर सध्याच्या गंभीर परिस्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटलांसोबत उपोषणाला बसायला पाहिजे होते. मात्र, हे दोन्ही नेते भाजपचे हस्तक बनले आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.