Uddhav Thackeray, devendra fadnavis, eknath shinde, manoj jarange Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : "जरांगे म्हणतात शिंदे हा भला माणूस..." शिंदेंच्या खासदाराने आंदोलनाबाबत लिहिलेल्या पत्रावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

Shivsena UBT On Milind Deora Letter : राजधानीच्या शहरात आंदोलन करणे हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मुंबईत येऊन आंदोलन करू नये, अशी भाषा करणे, त्यातही खास करून धनिकांचे बंगले असलेल्या दक्षिण मुंबईत आंदोलने वगैरेवर बंदी आणा, अशी मागणी करणे हे समस्त मराठी बांधवांसाठी अन्याय करणारे आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Sep : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानात उपोषण केलं. उच्च न्यायालयाने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य सरकार आणि जरांगे यांनी तातडीने पावले उचलून उपोषणावर तोडगा काढला.

मात्र, हे आंदोलन यशस्वीपणे पार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

खासदार मिलिंद देवरा यांनी आपल्या पत्रातून इथून पुढे दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये तसंच ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. याच पत्रावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई धनिकांच्या हस्तकांसाठी काय असेल ती असेल, पण मुंबई सगळ्यात आधी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. शिंदे यांचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा आहे. त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचे ‘स्वामित्व’ शिंदे यांच्या मिंध्या खासदारांना मान्य नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. जरांगे-पाटील म्हणतात त्याप्रमाणे शिंदे हा भला माणूस असेल तर या भल्या माणसाने त्याच्या मराठीद्वेष्ट्या खासदाराची हकालपट्टी करायला हवी. कारण मराठा समाजाच्या आंदोलनास, मराठी माणूस मुंबईत एकवटण्यास त्याने विरोध केला. भला माणूस त्याच्या खासदारावर ही कारवाई करेल काय? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे.

तसंच मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले आहे की, "एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे." अर्थात जरांगे-पाटील तसे म्हणत आहेत त्यामुळे शिंदे हे भला माणूस ठरत नाहीत. त्यासाठी भल्या माणसांसंदर्भातील व्याख्या बदलावी लागेल किंवा भल्या माणसांच्या व्याख्येसंदर्भात फडणवीसांना आणखी एका उपसमितीचे गठन करावे लागेल, असा टोलाही सामनातून एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

तर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे प्राण पणास लावले. जरांगे-पाटील हा नक्कीच भला माणूस आहे. त्यांनी मनावर घेतले नसते तर मराठा समाजाला काहीच हाती लागले नसते. त्यामुळे जरांगे-पाटील यांचे या लढ्यातील श्रेय मोलाचे आहे, पण हे श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक सामनातून केलं आहे.

दरम्यान, यावेळी मिलिंद देवरा यांचा चांगलाच समाचार सामनातून घेतला आहे. सामनात लिहिलं की, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतला मराठी तरुण एकवटला. चार-पाच दिवस मुंबईच्या रस्त्यावर, समुद्रावर तो फिरला. गावाकडून आणलेली चटणी-भाकर त्याने रस्त्यावर बसूनच खाल्ली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील धनिक मंडळाने आता आक्षेप घेतला आहे व त्या धनिक मंडळाचे प्रतिनिधी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आंदोलनासंबंधी आक्षेप नोंदवला.

दक्षिण मुंबईत मंत्रालय परिसरात कोणत्याही आंदोलनास यापुढे परवानगी देऊ नये असा ‘पियानो’ खासदार देवरा यांनी वाजवला. खासदार देवरा हे अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचे खासदार आहेत व त्यामुळेच दक्षिण मुंबईत झालेल्या मराठी जनांच्या आंदोलनास त्यांनी अशा प्रकारे विरोध केला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, उद्योग-व्यवसायाची कार्यालये वगैरेंची जागा असल्याचे खा. देवरा म्हणतात. जगातल्या कोणत्याही प्रमुख राजधानीच्या शहरात अशा प्रकारच्या आंदोलनांना परवानगी मिळत नाही, असेही खा. देवरा यांचे म्हणणे आहे, पण ते सपशेल चुकीचे आहे. राजधानीच्या शहरात आंदोलन करणे हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला अधिकार आहे.

त्यामुळे मुंबईत येऊन मराठी माणसाने आंदोलन करू नये, अशी भाषा करणे, त्यातही खास करून धनिकांचे बंगले असलेल्या दक्षिण मुंबईत आंदोलने वगैरेवर बंदी आणा, अशी मागणी करणे हे समस्त मराठी बांधवांसाठी अन्याय करणारे आहे. मराठी माणूस, श्रमिक गिरणी कामगारांचा घाम, रक्त येथे सांडले म्हणून दक्षिण मुंबईत धनिकांचे इमले उभे राहिले, पण शिंदे सेनेचे खासदार देवरा म्हणतात, दक्षिण मुंबईत मराठी माणसांना आंदोलनास परवानगी देऊ नये. देवरा असेही म्हणतात, "आर्थिक राजधानी आंदोलनामुळे थांबायला नको." श्रीमान देवरा, भयंकर बॉम्बस्फोटांनंतरही मुंबई थांबली नव्हती.

हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. मुंबई आंदोलनाने थांबणार नाही, पण मोदी-शहांचे हस्तक उद्योगपती मुंबई गिळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो गंभीर विषय आहे. मुंबई या धनिकांच्या हस्तकांसाठी काय असेल ती असेल, पण मुंबई सगळ्यात आधी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे. शिंदे यांचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा आहे. त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचे ‘स्वामित्व’ शिंदे यांच्या मिंध्या खासदारांना मान्य नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाने शिंदेंच्या खासदारावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT