
Manoj Jarange praised in Shirdi : मुंबईतील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारकडून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली मंत्रिमंडळाची उपसमिती गेली. जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबईतील उपोषणावर मंत्रिमंडळातील उपसमितीने निर्णायक असा तोडगा काढला.
मराठा आंदोलकांना समोरे गेलेले भाजप मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाचं आता राज्यभर कौतुक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील मंत्री विखे पाटलांच्या कामकाजाची दखल घेतली गेली. मुंबईतील ही लढाई जिंकल्यानंतर मंत्री विखे पाटील आज शिर्डीत दाखल झाले. तिथं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला समोरं जाताना आलेल्या दडपणावर भाष्य केलं.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्यानंतर मंत्री विखे पाटील मुंबईहून (Mumbai) त्यांच्या शिर्डी मतदारसंघात दाखल झाले. शिर्डी विमानतळावर मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांकडून मंत्री विखे पाटलांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार झाला. मराठा बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले, आरक्षणाचे संपूर्ण श्रेय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र आणि मनोज जरांगे पाटलांचे असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "साईबाबांच्या आशीर्वादाने मला ताकद मिळाल्याने एवढं मोठं कार्य करता आलं. मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवला, त्यांच्या मार्गदर्शनाने मराठा बांधवांचा अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले. जरांगे पाटलांचे देखील अभिनंदन! त्यांनी अतिशय निस्वार्थपणे आंदोलन चालवलं. समाजाला न्याय मिळावा. परंतु अन्य समाजावर अन्याय करून न्याय मिळावा, अशी जरांगे पाटलांची भूमिका नव्हती."
'आझाद मैदानावर गेल्यावर मनावर दडपण होते. मात्र विश्वासाला तडा जाणार नाही आणि न्यायालयाची भूमिका महत्त्वाची होती. आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्ह्यांपैकी गंभीर गुन्हे सोडून सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी निर्णय घेतला आहे. असुविधा झाल्याने मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. मुंबईत प्रशासनाने मराठी बांधवांसाठी उत्तम सहकार्य केले. मराठी माणसांमुळे मुंबई ठप्प झाले असेल तर वावगं काय?' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल, यावरून ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागपूर इथं आंदोलन देखील केलं. पण हे आंदोलन देखील यशस्वी सोडवण्यात भाजप महायुती सरकारला यश आलं. 'मंत्री भुजबळांनी ज्येष्ठ नेते आहात, याची आठवण करून देताना, ओबीसींवर अन्याय झालेला नाही, हे समजून घ्यावे,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
आरक्षणावर तोडगा काढताना, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि आमचा सतत विचार विनिमय सुरू होते. त्यामुळे पुढे जाता आलं. काही समज अन् गैरसमज असतात. ओबीसी समाजामध्ये गैरसमज झाला असेल, म्हणून त्यांना भूमिका समजवण्यासाठी ओबीसींसाठी समिती नेमल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मराठा नेते आरक्षणावर वेगवेगळी भाष्य करत आहेत, त्यावर बोलताना, मंत्री विखे पाटील म्हणाले, "आंदोलनात येऊन भूमिका मांडायची होती. बंद खोलीत भूमिका का मांडतात? पाच दिवसांमध्ये उपसमितीकडे कोणी संपर्क केला नाही. निर्णय झाल्यानंतर तुम्ही जर बोलत असाल तर, मराठा बांधवांचा अपमान केल्यासारखा आहे."
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवर बोलताना, मंत्री विखे पाटील यांनी समाज बांधवांच्या भावनांचा आदर होत आहे, त्याचं तुम्ही स्वागत केले पाहिजे, असा सल्ला दिला. तसंच सगळे आरक्षण देताना कधी मराठा बांधवांनी आक्षेप केला का किंवा विरोध केला का? राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक विचार करत आहेत, तुम्ही त्यांना भेटा. मला भेटा. मी समजून सांगायला तयार आहे. आंदोलनाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचे पुढाऱ्यांनी धंदा बंद केला पाहिजे असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.