Mumbai News, 30 Aug : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल आझाद मैदानात ठाण मांडलं आहे. शिवाय जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
जरांगेच्या या अल्टीमेटम मुळे राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. लाखोंचा समुदाय मुंबईत आल्याने पहिल्याच दिवशी मुंबईची कोंडी झाली होती. तर दुसरीकडे गणेशोत्सवामुळेही अनेकजण मुंबईत येत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश नायगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
मराठा आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलीस असणे गरजेचे असल्यामुळे हा आदेश काढल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय हे आंदोलन आणखी किती दिवस चालेल हे निश्चित नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
रजा रद्द करण्यासाठी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, 'गणेशोत्सव सणाचे निमित्ताने तसेच मराठा आरक्षण मागणीचे अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले मराठा बांधव यामुळे कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे दृष्टीने वरिष्ठांकडून तसेच पोलीस नियंत्रण कक्षाकडून वारंवार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले जात आहेत.
त्यामुळे सदर मनुष्यबळाची पूर्तता करणे क्रमप्राप्त असून त्यासाठी आस्थापनेवरील रूग्णनिवेदन, गैरहजर, अर्जित रजा, किरकोळ रजेवर असलेले पोलिस अंमलदारांना तात्काळ कर्तव्यावर हजर होणेबाबत सूचित करून त्यांना कर्तव्यावर उपस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे रजेवर असलेल्या पोलीस अंमलदारांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ कर्तव्यावर उपस्थित करावे. सर्व कंपनी लेखनिक / सहलेखनिक यांनी तात्काळ नमुद आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.