Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

BJP On Sharad Pawar : उद्धव ठाकरे- राहुल गांधी यांच्यात मध्यस्थी? : भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तथाकथित मध्यस्थी ही महाविकास आघाडी तथा विरोधक एक आहेत, हे दाखवण्याची खेळी आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सल्ला दिला, त्यानंतर राहुल यांनी सावरकर यांच्यासंदर्भात केलेली सर्व ट्विट डिलिट केल्याचे बोलले जात आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाने (BJP) पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे-राहुल गांधी यांच्यात आपण मध्यस्थी केली, असं दाखवून महाविकास आघाडीत पवार स्वतःचे महत्व वाढवून घेत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. (Mediation between Thackeray-Gandhi? : BJP's criticism of Sharad Pawar)

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यासंदर्भात काही ट्विट केली हेाती. तसेच, माफी मागायला आपण सावरकर नाही, असेही म्हटले होते. त्यानंतर मालेगावमधील सभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत, तर त्याला फाटे फोडू नका,’ अशा शब्दांत ठणकावले होते.

राज्यात मात्र शिंदे-फडणवीसांकडून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी ‘सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही,’ असे सांगून त्यांच्याबाबतची माहिती बैठकीत मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट डिलिट केल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपने त्यावरच आक्षेप घेतला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ ट्विट करत भाजपने पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यात म्हटले आहे की, देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक ही बंद दरवाजाआड होती. या बैठकीबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले की, सावरकर यांच्या मुद्यावर काँग्रेसने बोलण्याचे टाळायचे ठरविले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या मुद्यावर ठाम असून पुन्हा बोलणार नसल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ गांधी यांनी त्यांच्या भूमिकेत बदल केलेला नाही.

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तथाकथित मध्यस्थी ही महाविकास आघाडी तथा विरोधक एक आहेत, हे दाखवण्याची खेळी आहे. शरद पवार आपण मध्यस्थी केली, असं दाखवून महाविकास आघाडीत स्वतःचे महत्व वाढवून घेत आहेत, असा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT