Thane News: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे.ठाणे विशेष तपास पथकाने (SIT)या प्रकरणातील चार आरोपींना अटक केल्यानंतर ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या पतीची आत्तापर्यंत सातवेळा तब्बल 50 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. यानंत आता याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शिवसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदेंनाच चौकशीला बोलावलं आहे.
ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकानं प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी(ता.27) चौकशीसाठी बोलावलं आहे. त्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. याचदरम्यान,यापूर्वी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी तब्बल सातवेळा आणि सुमारे 50 तास चौकशी केली आहे.
दिवंगत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पहिल्या दिवसांपासून ही हत्या एक राजकीय कट असून त्याचे मुख्य सूत्रधार मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच राम पूर्णेकर यांनी सोमवारी (ता.26) पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ आणि फोटो समोर आणले. हत्येच्या अवघ्या दीड तास आधी राजेंद्र शिंदे हे अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत 'महाराजा चायवाला' हॉटेलमध्ये चहा पित बसले होते, असा दावा पूर्णेकर यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी राम पूर्णेकर यांनी शिंदे दाम्पत्याला 24 तासांत अटक करण्याची मागणी केली होती. तसेच पोलिसांनी या दोघांना अटक न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे 28 दिवस उलटूनही न्याय मिळत नसल्यानं, राम पूर्णेकर यांनी अखेर रिक्षानं येत एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतलं.
तर प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी ठाण्याच्या माजी महापौर व शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले होते. तसेच विरोधकांकडून आपलं पूर्णेकर हत्येप्रकरणात नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही म्हटलं होतं.
तसेच त्यांच्यावर पूर्णेकर कुटुंबानं केलेलं हत्याप्रकरणात केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे व राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचंही म्हटलं होतं. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्या स्वतःहून चौकशीला हजर राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.