

New Delhi News: लोकसभेचे संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील तीव्र आंदोलनांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या हजारो समर्थकांसह सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिकाही दाखल केली होती. मात्र,या याचिकेत मोठ्या त्रुटी आढळून आल्या. यानंतर याचिकेतील त्रुटी दुरुस्त करुन झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं अखेर ही याचिका दाखल करुन घेतली. याच याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयानं आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर 17 नोव्हेंबरनंतर सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राबवलेल्या एसआयआरच्या (SIR) माध्यमातून झालेल्या कथित मत चोरी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याच याचिकेवर थेट दिवाळीनंतर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि मतदार यादी दुरुस्ती प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर अर्थात १७ नोव्हेंबर २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगानं सोमवारी (ता.२६) आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. त्यामुळे या उत्तराचा अभ्यास करून आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना १० दिवसांचा वेळ दिला आहे.
राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी आणि निर्णय घेतल्याचा आरोप करत देशात रान पेटवलं आहे. मात्र,निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात एसआयआर संदर्भातील सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांनी एकमतानं घेतल्याचं सांगितलं आहे. यावेळी आयोगानं 'फॉर्म ६'मध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं आहे.
राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांच्या जवळपास 13 नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतदारयादीतून नावं वगळणं आणि डेटा ऑडिटमधील अनियमितता यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सध्या सुरू असलेल्या 'SIR' प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी,अशी मागणीही याचिकेत विरोधकांनी केली आहे.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यासह विरोधकांच्या याचिकेनंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या डोला सेन यांनीही आयोगाविरोधात नवी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या नव्या याचिकेलाही मुख्य प्रकरणासोबतच जोडले आहे. तसेच निवडणूक आयोगाला नवीन नोटीस बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.