Mira Bhayandar Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

Mira Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदरची प्रभाग रचना जाहीर, माजी नगरसेवकांना दिलासा! भाजपला होणार फायदा?

Mira Bhayandar MBMC Ward structure : मिरा-भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच असणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

MBMC News : निवडणुक अयोगाने मान्यता दिल्यानंतर मिरा भाईंदर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना २०१७ च्या प्रभाग नुसारच असून प्रभागांच्या हद्दीत कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभाग रचना तयार करण्यासाठी २०११ च्या जनगणेनुसार लोकसंख्या गृहित धरण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या तसेच ९५ या सदस्य संख्येतही कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत आधीच्या प्रभाग रचनेपेक्षा फारसे बदल होणार नसल्याचे मानले जात होते. त्यानुसार ही अपेक्षा खरी ठरली आहे.

प्रभाग रचना जाहीर होईपर्यंत माजी नगरसेवकांच्या मनात धाकधूक होती. प्रभाग रचनेत मोठा बदल झाला तर त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी करावी लागली असती. मात्र प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच राहिल्याने बहुतांश माजी नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. असे असले तरी आता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत त्यांना धावावे लागणार आहे. विशेषत: भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस लागणार हे निश्चित आहे.

गुरुवारी महापालिका मुख्यालयात तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये नव्या प्रभाग रचनेचे नकाशे प्रत्येक प्रभागानुसार लोकांच्या माहितीसाठी लावण्यात आले आहेत. या प्रभाग रचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. या हरकती व सूचना महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात दाखल करता येणार आहेत. मात्र नवी प्रभाग रचना अधीप्रमाणेच असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या जाण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

शहराची लोकसंख्या ८ लाख ९ हजार ३७८ एवढी गृहित धरुन नवी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. एकंदर २४ प्रभागांपैकी २३ प्रभाग चार सदस्यांचे असून उत्तन येथील एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. प्रत्येक चार सदस्यीय प्रभागातील लोकसंख्या सुमारे ३४ हजार तर एका तीन सदस्यीय प्रभागाची लोकसंख्या २५ हजार ५०० एवढी आहे. या लोकसंख्येत प्रभागाच्या हद्दीनुसार दहा टक्के फरक असू शकतो.

आरक्षणाची प्रतीक्षा

आगामी निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर झाली असली तर महिला, इतर मागासवर्गीय (ओबीसी) , अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांची आरक्षणे अद्याप निश्चित व्हायची आहेत. मात्र महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने प्रत्येक प्रभागात दोन महिला सदस्यांचा समावेश असणार हे निश्चित आहे. त्यानुसार निवडणुकीत निवडून येणार्‍या सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या किमान ४८ असणार आहे. इतर मागासवर्गीय वर्गासाठी २७ टक्के आरक्षण असल्याने या वर्गातील सदस्यांची संख्या किमान २६ असणार आहे.

मिरा भाईंदर शहरात अनुसुचित जातीची लोकसंख्या ३० हजार २४३ असून २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्यासाठी चार जागा राखीव होत्या. त्यात भाईंदर पूर्व येथील नवघर गावातील प्रभाग क्रमांक ११, मिरा रोडमधील १३ व १८ तसेच महामार्ग परिसरातील प्रभाग क्रमांक १४ यातील प्रत्येकी एक जागा राखीव होती. अनुसुचित जमातीची लोकसंख्या १२ हजार ५९६ एवढी असून त्यांच्यासाठी महामार्ग परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील एक जागा राखीव होती. आता नविन प्रभाग रचना २०१७ नुसारच असल्याने व लोकसंख्याही त्याप्रमाणेच गृहित धरण्यात आली असल्याने अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींसाठीचे प्रभागही आहे तसेच रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला सर्वाधिक फायदा

२०१७ च्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक फायदेशीर ठरली होती. त्यामुळे ९५ पैकी तब्बल ६१ नगरसेवक भाजपचे निवडून आले व भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित करता आली होती. त्यापाठोपाठ शिवसेना २२ व काँग्रेसचे १२ सदस्य निवडून आले होते. आता नवी प्रभाग रचनादेखील पूर्वी प्रमाणेच असल्याने २०१७ च्या निवडणूकीप्रमाणेच भाजप सर्वाधिक जागा पटकावण्यात यशस्वी होणार का ते निवडणुकीनंतरच निश्चित होऊ शकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT