प्रकाश लिमये
Mira-Bhayandar News : मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्यासंदर्भात तोडगा निघू न शकल्याने अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडीतही जागावाटपासंदर्भात बेबनाव झाल्याने अखेर मविआतही फूट पडली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेत अनेक ठिकाणी तिरंगी अथवा चौरंगी लढती पहायला मिळणार आहेत.
भाजप व शिवसेनेत युती व्हावी यासाठी प्रदेश पातळीवरुनही प्रयत्न झाले. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. भाजपने ९५ पैकी १३ जागा शिवसेनेला देऊ केल्या होत्या. मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नव्हता. भाजपही दिलेल्या प्रस्तावावर तडजोड करण्यास तयार नव्हती. त्यामुळे युती होणार नसल्याचे संकेत मिळाले होते. मात्र त्यावर सोमवारी रात्री उशीरा शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे दोघांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
भाजप ९५ जागांपैकी ८७ जागांवर निवडणुक लढवणार आहे तर शिवसेना ८२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. भाजपने आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सोडल्या आहेत तर शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग ९ व २२ या प्रभागांमध्ये व प्रभाग २१ मध्ये आपले उमेदवार दिलेले नाहीत.
भाजप शिवसेनेत फारकत झालेली असतानाच महाविकास आघाडीतही बेबनाव झाला आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ९ व २२ या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार गटाने जागा मागितल्या. मात्र काँग्रेसने ते अमान्य केले. त्याचप्रमाणे ठाकरे गटाने मागितलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेसची तयारी नव्हती. त्यामुळे अखेर ठाकरे गट, मनसे व शरद पवार गट एकत्र येत त्यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे गट ६०, मनसे १५ ते १६ व शरद पवार गट सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने मात्र बहुजन विकास आघाडीला सोबत घेतले असून बविआला भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठ मधील एक जागा दिली आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले की,गेल्या काही वर्षात भाजपची शहरातील ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेला १३ जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. मात्र त्यांना तो मान्य न झाल्याने युती झाली नाही.
युती तुटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील भाजपवर निशाणा साधत म्हटले की, भाजपला स्थानिक पातळीवर सुरुवातीपासूनच युती करायची नव्हती. त्यामुळेच त्यांनी १३ जागांचा प्रस्ताव दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.