प्रकाश लिमये
Mira-Bhayandar News : मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आली. येथे मराठी मतांमध्ये फूट पडल्याने शिंदेंना फायदा होत त्यांचे 29 नगरसेवक विजयी झाल्याची चर्चा आहे. मुंबईत एकत्र लढणार भाजप-शिंदेसेना मिरा भाईंदर महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढत होते. येथे काटे की टक्कर होईल, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार पराभव झाला. त्यामागे ठाकरे आणि मराठी मतांमधील फूट कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
ठाकरे गटाने केलेल्या मतविभागणीमुळे शिवसेनेला तब्बल २४ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. मतांमध्ये फूट पडली त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसला आणि भाजपला बंपर यश मिळाले.
शिवसेनेच्या विभाजनानंतर मिरा भाईंदरमधील बहुतांश नगरसेवक व नेते मंडळींनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे ठाकरे गट कमकुवत झाला. मात्र या निवडणूकीने नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी शिवसेनेचे परंपरिक मतदार मोठ्या संख्येने आजही ठाकरे गटासोबत राहिले असल्याचे चित्र निकालाच्या आकडेवरीवरुन स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने ८१ जागी तर ठाकरे गटाने ५६ जागांवर उमेदवार उभे केले होते. निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र ठाकरे गटाच्या आठ प्रभागातील उमेदवारांनी केलेल्या मतविभागणीमुळे शिंदे गटाचे तब्बल २४ उमेदवार पराभूत झाले. त्यातही सात जागांवर शिंदे गटाच्या उमेदवारांना मागे टाकत ठाकरे गटाचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिले आहेत.
महामार्गालगत असलेला पेणकर पाडा प्रभाग १६ हा शिवसेनेचे बहुसंख्येने मतदार असलेला परिसर. या प्रभागातील शिंदे गटाचे चारही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर ठाकरे गटाचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे या प्रभागात शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर निवडणूक लढवत असतानाही या प्रभागात शिंदे गटाची पिछेहाट झाली. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या मताची बेरीज भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कितीतरी अधिक आहे.
हीच परिस्थिती लगतच्या मीरा गाव येथील प्रभाग १५ मध्येही झाली. त्याठिकाणच्या शिंदे गटाच्या चारही उमेदवारांना ठाकरे गटाने केलेल्या मतविभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. याच पद्धतीने भाईंदर पूर्व येथील गोडदेव व नवघर या प्रभाग १० व ११ दोन्ही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील तीन जागा, प्रभाग ३ मधील ४ जागा, मिरा रोड येथील प्रभाग १३ मधील ४ जागा, काशी मिरा येथील प्रभाग १४ मधील ३ जागा, प्रभाग १८ व प्रभाग २३ मध्ये प्रत्येकी एक जागांवर शिवसेना व ठाकरे गट यांच्यात मतविभागणी होऊन त्याठिकाणी भाजप विजयी झाली.
मनसेमुळेही प्रभाग ११ मधील २ व प्रभाग २३ मधील एका जागेवर मराठी मतांची विभागणी झाली व त्याचा लाभ भाजपला झाला. मीरा भाईंदर महापालिकेत ९५ पैकी तब्बल ७८ जागा जिंकत भाजपने विक्रमी बहुमत मिळवले आहे. यावरून मिरा भाईंदर हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.