Eknath Shinde and Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case : नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे घराणेशाहीला चपराक; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Eknath Shinde and Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या विचारांशी नाही तर त्यांना फक्त पैशाचं देणं-घेणं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर आरोप

Ganesh Thombare

Mumbai News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र, या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, तर या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत 'मेरिटप्रमाणे निकाल लागला असून लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते, आमच्याकडे लोकसभेत आणि विधिमंडळात बहुमत आहे. त्यांच्याकडे बहुमत असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. कालचा निकाल म्हणजे घराणेशाहीला चपराक आहे. त्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काही देणं-घेणं नसून फक्त पैशांशी देणं-घेणं आहे,' अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय झाला. या निर्णयामुळे घराणेशाही हरली आणि लोकशाही जिंकली आहे. भरत गोगावले हे मुख्य व्हीप, शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. समोरच्या लोकांनी खोटे कागदपत्र दिल्याचे निकालात म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला विरोध केला, आता यांनी काँग्रेसलाच मांडीवर घेतलं. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली,' अशी टीका शिंदेंनी केली.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर आता ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, 'लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. पण त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ठीक नाहीतर सुप्रीम कोर्टालादेखील ते सल्ले देण्याचे काम ते करतील. कुठेही गेले तरी मेरिट आमच्या बाजूने आहे, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने दिला. पण अध्यक्षांबद्दल जे भाष्य त्यांनी केलं ते खालच्या पातळीचं आहे. त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही, पण जनता नक्की उत्तर देईल, असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं.

'बाळासाहेब होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी नियमात होत्या. मात्र त्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला. आम्ही आयोगाकडे बाळासाहेबांची शिवसेना मागितली. मात्र, त्यांनी स्वत:चं नाव पुढे केले. यावरून लक्षात आले, की त्यांना काय हवं. शिवसेना पक्षाच्या खात्यातील 50 कोटी मागण्याचं पापदेखील त्यांनी केलं, त्यांना फक्त पैशाशी देणं-घेणं आहे,' असा हल्लाबोल त्यांनी केला.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT