Maharashtra politics : महाविकास आघाडीचा विधानपरिषद निवडणुकीचा तिढा सुटला असून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात उमेदवार उतरविणार, याची घोषणाही करण्यात आली आहे. एकूण १७ मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला आठ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अद्याप तिढा कायम आहे.
विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर केला. एकूण १७ पैकी १५ जागांचा तिढा सुटला असून नांदेड आणि नाशिक या दोन जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
पुणे, सातारा-सांगली आणि ठाणे-पालघर या तीन जागांवर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव-बीड-लातूर, अमरावती, सोलापूर या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली, जळगाव आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर शिवसेनेने दावा सांगितला आहे.
सपकाळ यांनी यावेळी मीडियाशी बोलताना भाजपवर जोरदार आसूड ओढले. ते म्हणाले, भाजपच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. या निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होणार आहे. ट्रक भरून पैसा ओतला जाणार आहे. अनेक ठिकाणी पाच लाख अॅडव्हान्स देऊन नगरसेवकांना उचलण्याची तयारी सुरू झाली आहे.
भाजपकडून मित्रपक्षाचे मतदारही पळविले जात आहेत. २०१४ मध्ये व्होटचोरीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले होते. आता या घोडेबाजारातून ते सत्ता टिकवत आहेत. हार-जीत आपल्याठिकाणी आहे, निवडणुका येतील जातील. पण लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही मतदारांना साद घालत आहोत. लोकशाहीचा उत्सव निवडणुका असतात. या उत्सवामध्ये विरझण घालण्याचे काम भाजप करत आहे. आघाडीची संघर्षाची भूमिका असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.