Mumbai : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून युती, आघाड्यांवर चर्चा सुरू असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवीत रान पेटवणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज (सोमवारी) सकाळी प्रमुख पदाधिकऱ्यांची बैठक घेत राज यांनी ही वेगळी भूमिका घेतली आहे.
बैठकीत त्यांनी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. लोकसभेची २०१९ ची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकून देशभर राज्य करण्यासाठी सज्ज असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी व तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (आताचे केंद्रीय गृहमंत्री) या जोडगोळीला देशाच्या राजकारणाच्या पटलावरून पराभूत करण्याची भाषा २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी केली होती.
त्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरून मोदी-शाह यांच्या विरोधात रान उठवले होते. त्याचा परिणाम त्यावेळच्या निवडणुकीत काही झाला नाही. परंतु निवडणुकीनंतर मोदी-शाह या जोडीने राज ठाकरे यांच्यावर चौकशीचा ससेमिरा लावला. त्यामुळे राज ठाकरे काहीसे मवाळ झाले होते. तेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंग्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारसोबत हातमिळवणी करीत भाजपसोबत ही मैत्रीपूर्ण वातावरण ठेवले.
दुसरीकडे शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांनी काहीशी महाविकास आघाडी विरोधातली भूमिका घेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जमवून घेतल्याची चर्चा होती. त्यासोबतच आगामी निवडणुका राज ठाकरे भाजप व शिवसेना यांच्या युतीत लढतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यानंतर वातावरणात थोडासा बदल झाल्यानंतर राज ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे.
भाजप विरोधात भूमिका...
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी टोल नाक्यावर धाड टाकत कारवाईची मागणी केली. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी थोडीशी भाजप विरोधात भूमिका घेत कोकणात जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरून आंदोलन केले. त्यामुळे भाजप व त्यांच्यातील संबंध ताणले गेले. त्यानंतर आशिष शेलार व राज ठाकरे तसेच मनसेमध्ये त्यामध्ये काहीशी शाब्दिक चकमक झाली होती.
रणनीती काय असणार...
राज ठाकरे त्यामुळे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता मनसे नेते राज ठाकरेंनी प्रमुख नेत्यांची बैठक घेत आता आगामी लोकसभा निवडणुकीत रान पेटवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आगामी काळातील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीसमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी काळातील रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोयीस्कररित्या सगळ्यांना बगल दिली...
राज ठाकरे भाजपसोबत जाणार, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे एकत्र लढणार, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देणार अशा चर्चा आतापर्यंत अनेकदा रंगल्या असताना राज ठाकरे आगामी निवडणुकीत काेणाला टाळी देणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, राजकारणातील सर्वच चर्चांना राज ठाकरे यांनी सोयिस्कररित्या बगल दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.