Sangita Chendwankar Sarkarnama
मुंबई

MNS Female Leader from Badlapur : बदलापूर मधील 'MNS'ची 'ती' रणरागिणी आता विधानसभेच्या रिंगणात?

Sangita Chendwankar News : ...म्हणून मनसेच्या महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांच्या नावाची चर्चा

शर्मिला वाळुंज

MNS News : बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केल्यानंतर आता त्यांना मनसेमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बदलापूर शहरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांसह मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी यात पुढाकार घेतल्याने उशीरा का हाईना गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शहरात नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. याचेही नेतृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. या घटनेला वाचा फोडल्याबद्दल राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी चेंदवणकर यांचे जाहीर कौतुक केले आहे.

आंदोलनानंतर ठाकरे यांनी काही दिवसात बदलापुरात येऊन पालकांशी संवाद साधत चेंदवणकर यांची पाठ थोपटली होती. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी चेंदवणकर यांचा विशेष सत्कार करत त्यांचा गौरव केला. बदलापुरातील प्रकरणाला मनसेमुळे न्याय मिळाला याचा राज यांनी वारंवार उल्लेख केला. त्यामुळे संगिता चेंदवणकर यांच्यावर मनसेत मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच आता मुरबाड विधानसभा मतदारसंघातून चेंदवणकर यांना उमेदवार दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राज यांनी राज्यात सर्वाधिक जागा लढण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात आता चेंदवणकर यांच्या माध्यमातून महिला चेहरा देत विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आव्हान देण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठी लोकसंख्या बदलापूर(Badlapur) शहराची असून येथील मते निर्णायक ठरतात. गेली 15 वर्षे आमदार किसन कथोरे येथून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2009 च्या निवडणुकीत कथोरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश घेत 2014 आणि 2019 ची निवडणूक जिंकली. या निवडणुकांमध्ये त्यांना गोटीराम पवार, वामन म्हात्रे यांनी आव्हान दिले. सध्या वामन म्हात्रे आणि किसन कथोरे महायुतीत असून गोटीराम पवार राजकारणातून दूर झाले आहेत. मात्र त्यांचे पुत्र सुभाष पवार यंदा इच्छुक आहेत.

महायुतीत कपिल पाटील विरूद्ध किसन कथोरे भाजपांतर्गत तर वामन म्हात्रे आणि सुभाष पवार विरूद्ध किसन कथोरे असा शिवसेना – भाजप वाद सुरू आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती मनसेतील सुत्रांनी दिली आहे.

प्रभावी महिला उमेदवार -

शहरातील मराठी फेरिवाले यांच्या हक्कासाठी, उत्तर भारतीय विक्रेत्यांविरूद्ध, शहरातील विविध समस्यांवर आंदोलन करत संगिता चेंदवणकर प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांच्या रूपाने प्रभावी महिला उमेदवार मुरबाडमध्ये मिळू शकतो. यापूर्वी बहुजन समाज पक्षातर्फे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शोभा इंगळे तर 2009 मध्ये रत्ना गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये एकही महिला उमेदवार रिंगणात नव्हती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT