Rahul Shewale-Aaditya Thackeray
Rahul Shewale-Aaditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Rahul Shewale : आदित्य ठाकरेंनीच 'त्या' महिलेला माझ्याविरोधात फूस लावली ; शेवाळेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो

Rahul Shewale news update : सुशांत सिंह हत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे, अशी मागणी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतीच केली आहे.

'एयू म्हणजे अनन्या उद्धव नसून आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांच्या तपास सांगतो.त्यांना सत्यता जाणून घ्यायची आहे,'असे शेवाळेंनी सांगितले होते. त्यानंतर ठाकरे गटाने शेवाळेंचे काही वादग्रस्त व्हिडिओ शेअर केले होते. शेवाळे रविवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

शेवाळे म्हणाले, "माझ्याविरोधात आरोप करणारी महिला ही बार डान्सर आहे. त्या महिलेला ठाकरे गटाची फूस आहे. युवासेनेच्या प्रमुखांमुळे हा प्रकार घडत आहे. आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे. तिचा भाऊ सध्या कारागृहात आहे,"

"माझं राजकीय जीवन संपविण्याचा प्रकार सुरु आहे. कोरोनाच्या काळात मी तिला आर्थिक मदत केली होती. ती पाकिस्तानी एजंटच्या मदतीने माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. या महिलेला युवासेनेचा पाठिंबा आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या महिलेला फूस आहे”, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.

"त्या महिलेनं माझ्या पत्नीलाही धमकी दिली होती. पैशांसाठी ती मला ब्लॅकमेल करीत होती. कोरोना काळात मी तिला आर्थिक मदत केली. पैसे दिल्याचे बंद केल्यानंतर तिनं धमक्या देण्याचे सुरु केले. माझ्या तक्रारीनंतर ती दुबईच्या तुरुंगात होती. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिनं फेक अकाऊंट चालवलं. तिला युवासेनेचे कार्यकर्ते फॉलो करीत आहेत," असे शेवाळे यांनी सांगितले.

"माझ्यावरील आरोप खोटे आहेत, यामागे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याचा कट आहे. माझी बदनामी करुन मला राजकीय जीवनातून संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात मला उद्धव ठाकरेंनी मदत केली होती. ती महिला दाऊदशी संबंधीत आहे. एनआयएच्या माध्यमातून या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे," असे शेवाळे म्हणाले.

माझे खोटे फोटो काढले

पाकिस्तानी गँगशी ती संबंधित असल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. तिचे दाऊद गँगशीही संबंध असल्याचं शेवाळेंनी स्पष्ट केलं. माझा दुबईतील मित्र रेहमान याच्या सांगण्यावरून मी तिला मदत केली. मात्र, कालांतराने तिच्या अपेक्षा वाढत गेल्या. ती मला ब्लॅकमेलिंग करू लागली. मी जेव्हा पैसे देणं थांबवलं तेव्हा तिने माझे खोटे फोटो काढले, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीकडून कटकारस्थान

या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून कटकारस्थान रचले जात होते. माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून वरिष्ठ पोलिसांनाही राष्ट्रवादीकडून आदेश देण्यात आला होता. पोलिसांना या आरोपांमध्ये तथ्य वाटलं नाही. अंधेरी कोर्टात माझी बाजू मी मांडली. ही ब्लॅकमेलिंगची केस असल्याने यात कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले.साकीनाका पोलीस तिला शोधत आहेत. इमेलद्वारे या महिलेशी संपर्क साधूनही ती पोलिस ठाण्यात येत नाही. पत्रव्यवहार करूनही ती आली नाही, असे शेवाळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT