Sanjay Raut, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : संघर्ष, अपमान अन् अवहेलना पचवून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले...; 'सामना'तून राऊतांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं, पण...

Sanjay Raut congratulated CM Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी त्यांनी महायुतीच्या विजयावर संशय देखील व्यक्त केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Dec : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे महायुतीवर आणि खासकरून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेतून किंवा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून ते महायुतीवर हल्लाबोल करत असतात.

अशातच आजच्या सामनामधील अग्रलेखातून त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी त्यांनी महायुतीच्या विजयावर संशय देखील व्यक्त केला आहे. शिवाय 'आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत.' असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले

सामनामध्ये त्यांनी लिहिलं, 'मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे.

आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी ‘धो-धो’ मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

‘शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला’, अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला?' असा सवाल राऊतांनी या अग्रलेखातून उपस्थित केला.

शिवाय सत्तास्थापनेच्या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता.

त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत, असं म्हणत त्यांनी महायुतीच्या घवघवीत यशावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT