BJP Mumbai Internal Conflict | Ritu Tawde Sarkarnama
मुंबई

Mumbai BJP dispute : मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अमित साटम यांच्यासमोरच महापौर अन् शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये जोरदार खडाजंगी

BJP Mumbai Internal Conflict : सोमवारी मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीपूर्वी अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यासोबत एक बैठक घेतली.

Jagdish Patil

Mumbai News, 25 Aug : मुंबई महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. नगरसेवकांमधील मतभेद आणि गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीतच हा वाद झाल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण समितीवरील एका नियुक्तीच्या मुद्द्यावरून महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची माहिती आहे.

याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमधील हेवेदावे आणि अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. सोमवारी मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीपूर्वी अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यासोबत बैठक घेतली.

या बैठकीत महापालिकेत पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. नगरसेवकांमधील मतभेद, समन्वयाचा अभाव आणि त्यामागची कारणे याबाबत साटम यांनी सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते. मात्र, अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी झालेल्या याच बैठकीत महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षा आमनेसामने आल्याने पक्ष नेतृत्वाचीही कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

अमित साटम यांनी नगरसेवकांना एकमेकांशी स्पर्धा न करता पक्षाच्या हितासाठी काम करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. मुंबईकरांनी आपल्याला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, असे साटम यांनी दिल्याचं सुत्रांनी सांगितलं.

दरम्यान, महापौर रितू तावडे यांच्या कामकाजाबाबतही अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरांच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचेही समजते. एकीकडे भाजप नेतृत्वाकडून नगरसेवकांमधील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येच वाद झाल्याने मुंबई भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या वादाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT