Mumbai ST Bank annual report Godse photo : अॅड. गणुरत्न सदावर्ते यांचे वर्चस्व असलेल्या एसटी बँकेचा अर्थात, स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचा 72वा वार्षिक अहवालातील फोटोवरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. एसटी बँकेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आला आहे.
यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यापूर्वीही वार्षिक अहवालात नथुराम गोडसे याचा फोटो वापरण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी, 'हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे,' असा घणाघात केला.
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदात्तीकरणाचा हा प्रकार आहे. ॲड. गुणरत्न सदावर्तेंवर (Gunaratna Sadavarte) तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला खुनी नथुराम गोडसेचा फोटो छापणे अत्यंत शरमेची बाब असल्याची चौफेर होऊ लागली आहे.
एसटी बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल निवडून आल्यापासून सातत्याने वाद निर्माण होत आहेत. सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ आणि कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. त्यातून आता एक नवा वाद सुरू झाला. या अहवालात छापलेल्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांचा पत्नी आदींचे फोटो आहेत.
एसटी बँकेने तयार केलेल्या एटीएम कार्डवर कमळाचे चिन्ह छापण्यात आले आहे. या संपूर्ण अहवाल पुस्तिकेत एकूण 15 फोटोंमध्ये गुणरत्न सदावर्ते आहेत. काही फोटोंमध्ये पत्नी, मुलीचाही समावेश आहे.
एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेसारख्या विकृत माणसाकडून दुसरी अजून अपेक्षा तरी काय? आमच्या राजाच्या आणि प्रभू रामचंद्रांसोबत एका खुन्याचा फोटो लावणे कितपत योग्य आहे? शहाजी पाटील समितीने बँकेचा कोट्यवधींचा घोटाळा उघड करूनही या व्यक्तीवर कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे, अशी टिका केली.
एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला खुनी नथुराम गोडसेचा फोटो छापणे लांच्छनास्पद आहे. शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ राजे होते. त्यांच्या बाजूला नथुरामला बसवणे हा किळसवाणा प्रकार आहे. बँकेत केलेले घोटाळे लपवण्यासाठी राज्य सरकारमधील प्रभावी नेत्यांसोबत फोटो छापण्यात आले आहेत, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.